मुंबई : आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ऑनलाईन डेटिंगला चांगलाच वाव निर्माण झाला आहे. तरुणाईत ऑनलाईन डेटिंगची क्रेझही कमालीची वाढली आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीला तुम्ही भेटू शकता. सगळं ठिक झालं तर तुम्ही पुढे ते नातं वाढवू शकता. पण ऑनलाईन डेटिंगच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदाच कुणाला भेटणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.
1) त्या मुलावर सोशल मीडियातून लक्ष ठेवा
होय! तुम्ही योग्य वाचताय. सोशल मीडियातून तुम्ही भेटणार असलेल्या मुलावर लक्ष ठेवण्याचे अनेक फायदे आहे. सर्वात आधी तर तुम्ही चॅटिंग करत असलेल्या मुलाचा फोटो बघा. तो तोच आहे का हे तपासून बघा. तो नोकरी कुठे करतो, त्याची दिलेली माहिती तुम्ही तपासून बघू शकता. शक्य झाल्यास त्याचे विचार, त्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी त्याचे स्टेटस, अपडेट चेक करा. त्यासोबतच त्याला काय आवडतं? तो फार पार्टी करणारा आहे की, घरी राहणं पसंत करणारा आहे? हेही तुम्ही जाणून घेऊ शकता.
2) मित्र-मैत्रिणींना सांगून ठेवा
तुम्ही किती वर्षांपासून एकमेकांसोबत न भेटता ऑनलाईन चॅटिंग करता हे फार महत्वाचं नाही. पण तुम्ही पहिल्यांदाच त्याला भेटायला जाणार असाल तर आधी तुमच्या मित्र-मैत्रिणींना याची माहिती देऊन ठेवा. तसेच तुम्ही जाणार असाल त्या लोकेशनची माहिती द्या. जर तुम्हाला उशीर होणार असेल तर तशीही माहिती द्या. असे का हे समजायला तुम्ही तितके समजदार असालच.
3) जागेची निवड
ऑनलाईन डेटिंगच्या माध्यमातून पहिल्यांदाच डेटला जात असाल तर थेट त्याच्या घरी जाण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी किंवा वर्दळीचं ठिकाण निवडा. त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर, तुम्ही कधीही न ऐकलेल्या ठिकाणी जाऊ नका. शहरातीलच गर्दीचं ठिकाण असेल तर फारच चांगलं.
4) अपेक्षा स्पष्ट करा
तुमच्या काय अपेक्षा आहेत, हे तुमच्या ऑनलाईन मित्राला आधीच स्पष्ट सांगणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला केवळ कॅज्यूअल डेटींग करायचंय, केवळ टाईमपास करायचाय, सिरीअस नातं हवंय की, केवळ मैत्री हवीये. हे त्याला क्लीअर असू द्या. त्यासोबतच तो कशाप्रकारच्या नात्याच्या शोधात आहे हेही जाणून घ्या. या स्पष्टतेमुळे सगळं योग्य मार्गाने होईल.
5) जर वाईट परिस्थीती आली तर....
जर ही भेट वेगळ्याच वळणावर गेली किंवा तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर? तर तेथून पळ कसा काढता येणार याचा प्लॅन आधीच तयार ठेवल्यास अधिक योग्य. किंवा एखाद्या अशा कारणाचा विचार करुन ठेवा जे खरं त्याला वाटेल आणि तुम्हाला तेथून सुटका मिळेल. एखादा तुमचा मित्र जर तुम्हाला तिथे घेण्यासाठी येत असेल तर फारच चांगलं.