(Image Credit : Psychalive)
प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून काहीना काही अपेक्षा असतात. खरंतर आपल्या पार्टनरकडून काही गोष्टींची अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. अर्थात त्या चुकीच्या किंवा फार जास्त असू नयेत. अनेकदा काही रिलेशनशिप या एकमेकांकडून फार जास्त किंवा चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळेच टिकत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ७ अशा गोष्टी सांगत आहोत ज्यांची तुम्ही तुमच्या पार्टनरकडून अपेक्षा करू नका. याने तुम्हाला तुमचं नातं चांगलं आणि टिकवून ठेवण्यास मदत होईल.
तुमच्या मनातलं ओळखण्याची अपेक्षा
प्रत्येकवेळी तुमच्या मनात काय सुरू आहे किंवा तुम्ही काय विचार करताय हे पार्टनरने स्वत:हून ओळखावं ही खरंतर चुकीचीच अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही काही वर्षे जरी तुम्ही सोबत घालवले असतील तरीही याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवंय किंवा त्या दिवशी तुम्हाला काहीतरी स्पेशल करायचं आहे हे त्याला आपोआप कळेल. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरने तुमच्यासाठी काही वेगळं करावं किंवा काही वेगळं घ्यावं असं वाटत असेल तर त्याला थेट सांगा. हे कधीही चांगलं.
नेहमी परफेक्ट दिसावं
तुम्हाला जर असं वाटत असेल की, तुमच्या पार्टनरने प्रत्येकवेळी परफेक्ट दिसावं तर तुम्ही एखाद्या बाहुलीसोबत डेट करायला हरकत नाही. कुणी कसं रहावं, कुणी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग तो-ती तुमचा पार्टनर का असेना. जसे तुम्ही आहात तसाच जर दोघांनाही आनंद मिळत असेल तर कशाला बनावटीवर इतकं लक्ष केंद्रीत करायचं.
हो ला हो...
दोन व्यक्ती एकसारखे असू शकत नाहीत आणि त्यांचे विचारही तंतोतंत सारखे नसतात. वेगवेगळ्या गोष्टींवर तुमच्या पार्टनरचे वेगळे विचार असणे यात काहीच गैर नाही. महत्त्वाचं हे ठरतं की, तुम्ही तुमचा पार्टनर जसा आहे तसा स्विकारणे. एकमेकांच्या विचारांचा, मतांचा सन्मान करणे हे महत्त्वाचं आहे. यानेच तुमचं नातं अधिक काळ चांगलं राहू शकतं.
सगळं तूच बघ, तूच काळजी घे
लग्न झालेलं असो वा तुम्ही सिरिअस रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा अर्थ हा नाही की, तुमच्या पार्टनरनेच तुमच्या गरजांची काळजी किंवा घराची संपूर्ण जबाबदारी घ्यावी. पार्टनरने तुमची काळजी घ्यावी, तुम्हाला समजून घ्यावं ही अपेक्षा करणे चूक नाही. पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं किंवा तिला प्रत्येक गोष्टीकडे बघायला सांगणं चुकीचं आहे.
आधीसारखाच वाग
जसजसा काळ पुढे जातो व्यक्ती बदलतो. अनेकदा आपण विचार करतो तशा गोष्टी होत नसतात. म्हणजे आता ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती व्यक्ती पुढील काही वर्षांनी आणखी बदलेल. हेच तुमच्यासोबतही घडू शकतं. त्यामुळे हे चुकीचच आहे की, पार्टनरला आधीसारखाच रहा, बदलू नकोस, असाच वाग किंवा तसाच वाग म्हणणं.
शारीरिक संबंध
तुमचं लग्न जरी झालं असेल तरी सुद्धा तुमचा किंवा समोरच्या व्यक्तीचा मूड झाला म्हणून शारीरिक संबंध ठेवणे योग्य नाही. म्हणजे ही गोष्ट दोघांच्याही आनंदाची आहे. त्यामुळे ही गोष्ट दोघांच्याही इच्छेनुसारच व्हायला हवी. एकट्याच्या मनानुसार नाही.
कामाची तडजोड
ही फारच चुकीची अपेक्षा आहे. आपल्या कामासाठी पार्टनरला त्याच्या करिअरसोबत तडजोड करायला सांगणे चुकीचे आहे. हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. समोरच्या व्यक्तीने स्वत:हून असं केलं तर वेगळी गोष्ट आहे. पण कुणाला यासाठी जबरदस्तीने असं काही सांगणे चुकीचेच आहे.