मुंबई- 84 टक्के भारतीय त्यांचे पासवर्ड जोडीदाराबरोबर शेअर करत असल्याचं मॅक्फीच्या अभ्यासातून समोर आलं आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये नोव्हेंबर 2017मध्ये 600 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. तंत्रज्ञान नात्यातील महत्त्वाचा भाग असल्याचं 77 टक्के भारतीय लोकांना वाटत असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे.
नात्यामध्ये प्रायव्हसी महत्त्वाची असते असं 89 टक्के भारतीयांना वाटतं. पण 84 टक्के भारतीय लोक त्यांचे मोबाइल पासवर्ड, सोशल मीडिया पासवर्ड आणि पिन नंबर त्यांच्या जोडीदाराबरोबर शेअर करतात. मॅक्फीच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. खासगी माहिती आपल्या जोडीदाराशी शेअर करताना सतर्कता बाळगण्याचं आवाहनही केलं आहे. . मॅक्फीच्या अभ्यासानुसार, तंत्रज्ञानाचा वापर नात्याचा एक भाग असल्याचं 77 टक्के लोकांना वाटतं. तर 67 टक्के मुलं व मुलींना वाटतं की त्यांचा जोडीदार त्यांच्यापेक्षा इंटरनेटवरील गोष्टींकडे जास्त लक्ष देतो.
मॅक्फीचे उपाध्यक्ष व्यंकट कृष्णापूर यांनी एका वक्तव्यात म्हंटलं की, आज कनेक्टेड लाइफस्टाइलमध्ये रोजची कामं आणि ग्राहकांशी संपर्क तंत्रज्ञान आणि अप्लिकेशनच्या माध्यमातून केला जातो. तंत्रज्ञानावर आपण विश्वास ठेवतो तसंच अवलंबूनही आहोत. पण तरिही आपली खासगी माहिती त्यावर शेअर करू नका. गरजेपेक्षा जास्त माहिती सांगण्यापासून सतर्क राहायला हवं, असं त्यांनी म्हंटलं.प्रत्येक चारपैकी तीन भारतीय व्यक्तीला त्यांच्या जोडीदाराचं लक्ष वेधण्यासाठी त्याच्या डिवाइसशी स्पर्धा करावी लागली. 21 ते 40 वयोगटाच्या बाबतीत हि गोष्ट एकाहून जास्त वेळा झाल्याचं या अहवालात म्हंटलं आहे.
याचबरोबर 81 टक्के भारतीयांचं म्हणणं आहे की, त्यांना त्यांचे मित्र, परिवाराचे सदस्य किंवा इतर महत्त्वाची व्यक्तीबरोबर असताना मोबाइलकडे ते जास्त लक्ष देतात यासाठी वाद घालावा लागला.