अबब! एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ५० लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2016 3:03 PM
तीस ते सत्तर लाख (३-७ मिलियन) इन्स्टाग्राम फॉलोवर्स असणाऱ्या स्टार्सना कंपन्या एका पोस्टसाठी ७५ हजार डॉलर्सपर्यंत (५० लाख रु.) रक्कम देतात.
सोशल मीडियाच्या आगमनाने माहिती व तंत्रज्ञानाचे जग पूर्णपणे ढवळून निघाले आहे. पारंपरिक व्यावसायिक चौकटी कोलमडून नवे, अधिक सृजनशील आणि आक्रमक बिझनेस मॉडेल्स तयार झालेत. जाहिरातदारांसाठी तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे नंदनवनच. आपल्या टार्गेट ग्राहकांपर्यंत उत्पादन घेऊन जाण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून अनेक कंपन्या फेसबुक-इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया वेबसाईटस्चा खुबीने वापर करत आहेत.सध्या सोशल मीडियावर जाहिरातीचा नवा फंडा म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रेटींना प्रोडक्टस्बद्दल पोस्ट करायला लावणे. फेमस स्टार्स, मॉडेल्स, खेळाडूंचे लाखो-कोट्यवधी फॉलोवर्स असतात. त्यांनी जर एखाद्या उत्पादनाबद्दल पोस्ट केले म्हणजे ते लाखो लोकांपर्यंत पोहचणार. म्हणजे ‘बझ’ निर्माण होणार.‘कॅप्टिव्ह-८’ कंपनीने दिल्या माहितीनुसार, तीस ते सत्तर लाख (३-७ मिलियन) इन्स्टाग्राम फॉलोवर्स असणाऱ्या स्टार्सना कंपन्या एका पोस्टसाठी ७५ हजार डॉलर्सपर्यंत (५० लाख रु.) रक्कम देतात. तसेच ५० हजार ते पाच लाख फॉलोवर्स असणारे इन्स्टाग्राम यूजर्सदेखील एका जाहिरात पोस्टसाठी एक हजार डॉलर्सपर्यंत (६७ हजार रु.) कमवू शकतात. अशा प्रकारे वाढणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण पाहता इन्स्टाग्रामने आता या यूजर्सना ‘#अॅड’ किंवा ‘#स्पॉन्सर्ड’ असे हॅशटॅग वापरणे बंधनकारक केले आहे. कायली जेनर, किम कार्दाशियन यांना आपल्या अनेक पोस्टना कंपनीच्या अशा धोरणामुळे हे हॅशटॅग जोडावे लागले.