सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. अशा परिस्थिती लोकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतात सुद्धा २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना घरी थांबण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. अशा परिस्थितीत अनेक अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत. ते म्हणजे लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे.
घरगुती हिंसाचारात महिला आणि मुलांना या अत्याचाराचं शिकार व्हावं लागत आहे. रिपोर्टनुसार ब्राजील ते जर्मनीपर्यंत, इटलीपासून चीनपर्यंत प्रत्येक घरात महिलांना या प्रकाराचा सामना करावा लागत आहे. चीनमधील हुबेई प्रातांतील लॉकडाऊन आता हटवण्यात आला आहे. पण मागच्या ४० दिवसात घरगुती हिंसाचारात तीन पटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ४७ घटना समोर आल्या होत्या. सध्या हा आकडे १६२ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या प्रकारात वाढ झाली आहे.
घरगुती हिंसाचारात झालेली फक्त वाढ चीनमध्ये नाही तर ब्राजीलमध्ये सुद्धा अनेक घटना समोर आल्या आहेत. ब्राजीलमध्ये सरकारतर्फे देण्यात येत असलेल्या आश्रयगृहात महिलांची संख्या वाढत आहे. यासाठी काही देशांची २४ तास हेल्पलाईन कार्यरत आहेत. ज्यामुळे महिला आणि मुलांवर होत असलेल्या अन्यायावर नियंत्रण ठेवता येईल. इटलीमध्ये सुद्धा अशीच परिस्थीती आहे
इटलीमधील सामाजीक कार्यकर्त्यांना महिलाच्या ईमेल आणि मॅसेजेसचं प्रमाण वाढलं आहे. अनेक महिलांनी हिंसेमुळे स्वतःला बाथरूमध्ये बंद केलं आहे. कारण लॉकडाऊनमुळे महिला घराच्याबाहेर पडू शकत नाही. रस्त्यांवर पोलिसांचा पहारा आहे. नियम तोडला तर त्यांना दंड सुद्धा भरावा लागेल. पण स्पेनमधिल नियमानुसार घरगुती हिंसेमुळे महिलांना नियम तोडल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागत नाही. ९ मार्चला घरगुती हिसेंमुळे हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पाच दिवस ही महिला सतत घरगुती हिंसाचाराची शिकार होत होती. त्यानंतर पतीने अत्यंत क्रुरतेने तीची हत्या केली.
भारतातील घटनांमध्ये वाढ
लॉकडाऊनमध्ये भारतात सुद्धा महिलांवर होत असलेल्या अत्याचारांत वाढ होत आहे. यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरवरून हेल्पलाईन दिली आहे. त्या लिंकवरून महिला आपली तक्रार दाखल करू शकतात.