मॉर्डन स्वरूपाचे विवाह प्रस्ताव ही आता आपली लाइफ स्टाइल झाली आहे. पण म्हणून आॅनलाइन जोडीदार निवडून बिनधास्त लग्न करावं असं नाही. लग्नातले पाहण्या निरखण्याचे नियम इथेही आहेतच, पण थोडे वेगळे !
- आधुनिक प्रकारचे विवाह प्रस्ताव हे आजच्या बदलत्या जीवनशैलीचा एक परिणाम आहे हे खरं. बदलत्या जीवनशैलीबरोबर आपल्या लग्नपद्धतीही बदलल्या. तद्वत फेसबुकसारख्या समाजमाध्यमावर ओळख होऊन जुळलेले लग्न हा एक नवीन प्रकार आपल्या जीवनात रूढ होऊ पाहतोय. फेसबुक, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअॅप यासारखी समाजमाध्यमं ही दैनंदिन जीवनातील नित्याची बाब झाली आहे. समाजमाध्यमं हाताळताना ओळख नसलेल्या नव-नवीन लोकांच्या संपर्कात येणं अपरिहार्य झालं आहे. आॅनलाइन ओळखीवरून ठरवलेल्या लग्नाला प्रतिष्ठा आणि स्टेटस मिळत आहे. पण यामुळे नात्यांमध्येही काही प्रश्न आणि तणाव निर्माण होत आहे. जितक्य जबाबदारीनं मुलं मुली स्वत:चा आॅनलाइन जोडीदार निवडतात तितक्याच जबाबदारीनं एकमेकांची खात्री करून ती आपल्या आई बाबांनाही वाटेल यासाठीचे मार्ग मुला मुलींनी जबाबदारीनं शोधायला हवेत. आणि आपली ही आॅनलाइन पसंती आपल्या आई बाबांना पटवून देताना मुल मुली आपण निवडलेल्या जोडीदाराला परत एकदा पारखू शकता. आपल्यासाठी तो /ती जोडीदार म्हणून योग्य आहे ना याची खात्री आई बाबांना देता देता ती स्वत:लाही नव्यानं होवू शकते. आॅनलाइन लग्न ठरवताना मुला मुलींनी हा विषय नीट समजून घेऊन काही नियम पाळायला हवेत. आॅनलाइन लग्न ठरवताना..*आॅनलाइन लग्न ठरवताना आपण निवडलेल्या जोडीदाराचे कोणते गुण पाहिलेत. त्याच्यातले दोष कोणते याबाबत आई बाबांना माहिती द्यावी. * आपण जोडीदार निवडून लग्न करण्याचा जो निर्णय घेतला या दरम्यानची स्वत:ची विचारप्रक्रिया काय होती, कोणत्या प्रोसेसमधून आपल्या तो /ती जोडीदार म्हणून आवडला किंव आवडली हे आई बाबांना नीट समजावून सांगावं. * एकमेकांबद्दल कोणती माहिती, कशी आणि कुठून मिळवली याबाबत आई बाबांना सविस्तर सांगावं. * मुला मुलींनी आई बाबांना आपल्या फेसबुक पेजवर आणि अकाऊंटवर नेवून आपण परस्परांना शेअर केलेली माहिती वाचावयास द्यावी. दोन्हीकडचे कॉमन फ्रेंडस बघून त्यातील आई बाबांना हवे असलेल्यांचे नंबर द्यावेत. आई बाबांनी अशा कॉमन फ्रेंडसना फोन करून निवडलेल्या मुला/मुलीविषयी काही माहिती घ्यायची असेल तर चिडचिड न करता. त्याला विरोध न करता आई बाबांना ते करू द्यावं. आई बाबा ते का करता आहेत हे हवं तर त्यांच्याशी शांतपणे बोलून समजून घ्यावं. * आई बाबांना जर मुलांनी निवडलेल्या जोडीदाराच्या घरी जावून त्याची पाशर््वभूमी समजून घ्यायची असेल तर त्यांना ते अवश्य करू द्यावं. उलट स्वत: पुढाकार घेवून मुला मुलींनी परस्परांच्या आई वडिलांना एकमेकांच्या घरी बोलायला आमंत्रित करायला हवं. * आई बाबांना प्रत्यक्ष भेटीत आपण निवडलेला जोडीदार कसा वाटला याबाबतची त्यांची मतं त्यांच्याशी शांतपणे बोलून समजून घ्यावीत. काही विरोधी मतं असतील तर ती तशी का? हे थोडा वेळ घेवून स्वत:ही ती तपासून पहावीत. आपल्याला मिळालेली माहिती आणि आई बाबांना मिळालेली माहिती यात काही फरक आहे का? कोणता? का? याबाबतही मुलांनी थोडी जागरूकता दाखवून खात्री करून घ्यावी.* आपण निवडलेल्या जोडीदाराबद्दल जर आई बाबांची लवकर खात्री पटत नसेल तर मुलांनी थोडा धीर धरावा. आई बाबांना त्यांचा वेळ घेवू द्यावा. त्यांना त्यांचा निर्णय देण्यासाठी घाई करू नये. * आॅनलाइन निवडलेल्या जोडीदाराशी प्रत्यक्ष लग्न ठरल्यानंतर जर आई बाबांना किंवा स्वत: मुला मुलींना काही शंका आल्यास थोडं थांबून घेवून मनातली शंका आधी दूर करावी. * लग्न ही जबाबदारीनंच ठरवण्याची गोष्ट आहे, भेट कुठं झाली यापेक्षा अनुरुपता तपासून पाहणं जास्त महत्वाचं आहे.