ऊपरवाले ने हर किसी के लिए कहीं न कहीं, कोई न कोई एक स्पेशल इंसान जरूर बनाया है... दिल तो पागल हैं या सिनेमातील हा माधुरीचा डायलॉन ऐकला की, अनेकांना असं वाटतं हा डायलॉग त्यांच्यासाठीच आहे. पण खऱ्या आयुष्यात साथीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. खरं आयुष्य हे डायलॉगबाजीवर चालत नसतं. तसेच साथीदार निवडताना या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही तर नंतर पश्चाताप करुन फायदा होणार नाही.
परफेक्ट जोडीदारीचा शोध
अनेकदा फरफेक्ट जोडीदाराच्या शोधात हातून चांगली स्थळं निघून जातात. या जगात कुणीच परफेक्ट नाहीये, त्यामुळे परफेक्ट जोडीदार शोधण्यापेक्षा राइट जोडीदार शोधा. तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये काय हवंय, त्याची एक लिस्ट तयार करा. मग याचा विचार करा की, तुम्ही यातील कोणत्या गोष्टी असल्या आणि नसल्या तर तुम्हाला चालेल. पूर्ण लिस्ट मिळवण्याच्या नादात तुम्हाला आयुष्यभर एकटच रहावं लागू शकतं.
प्रेमाने पोट भरत नाही
अनेकदा काही लोक प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखू शकत नाहीत आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. लव्ह मॅरेजमध्ये अनेकदा हा विचार केला जातो की, प्रेमाच्या आधारे ते आयुष्य जगतील पण केवळ प्रेमाने पोट भरत नाही. तुम्ही प्रेमाला आपली ताकद बनवा, मजबूरी नाही. जर दोघांमध्ये समजूतदारपणा असेल तर नातं घट्ट होईल.
फॅमिलीकडे दुर्लक्ष करणे
अनेकदा काही लोक जोडीदार निवडताना असा विचार करतात की, परिवार कसाही असो काय फरक पडतो? सोबत मुला-मुलीला रहायचंय ना? पण सत्य हे आहे की, लग्न केवळ दोन लोकांचं नाही तर दोन परिवारांचं नातं असतं. त्यामुळे लग्न ठरवताना दोन्ही परिवारातील सदस्यांबाबत जाणून घ्या. त्यांच्या वागण्यावरुन मुला-मुलीच्या वागण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
एकसारखी आवड किंवा कमतरता
मुलगा आणि मुलीची पसंत जर एकसारखी असली तर त्यांना असं वाटतं की, ते दोघे किती एकसारखे आहेत. पण केवळ आवडी-निवडी एकसारख्या असून भागत नाही. दोघांचा एकमेकांवरील विश्वास आणि विचार हे जास्त महत्त्वाचे आहेत. आवड काही प्रमाणात एकसारखी असणं गरजेचं असतं. अनेकदा मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एकसारख्या कमतरता असतात. त्यामुळे त्यांना वाटतं की, हेच स्थळ योग्य आहे कारण काही कमतरता माझ्यात आहेत आणि काही त्याच्यात.
पार्टनरला बदलणार
अनेकदा मुला/मुलींना वाटतं की, ते पार्टनरला बदलतील. हा विचार चुकीचा आहे. तुम्ही ज्या रुपात समोरच्याला पसंत केलं आहे, त्यातच स्वीकार कराल तर चांगलं होईल. कुणाला बदलणे सोपे नाहीये आणि योग्यही नाहीये. त्यापेक्षा स्वत:ला बदलण्याचा विचार करा.
इमोशनल निर्णय
लग्न हे दोन हृदयांचं नातं आहे हे बरोबर आहे पण प्रॅक्टिकल होणेही तितकेच गरजेचे आहे. इमोशनल होऊन घेतलेला निर्णय योग्य नसतो. प्रेमाशिवाय जीवनात पैसे, करिअर, सिक्युरिटी, फॅमिली इत्यादी गोष्टीही गरजेच्या असतात. जर जीवनात भौतीक गरजा पूर्ण न झाल्यास चांगली चांगली नाती तुटतात.
घाई गडबडीत अटी मान्य करणे
लगेच सगळं ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीला अनेकजण पसंत करतात. पण काहीही फायनल करण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. जगात लाखो लोक जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यामुळे काही कमी नाहीये. तसेच अनेकदा घरातील लोक मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हावं यासाठी विचित्र मागण्या मान्य करुन करतात. अशाने दोन्हीबाजूच्या अपेक्षा वाढतात. आणि त्या पूर्ण झाल्यास नात्यात कटूता येते.
स्वभावकडे दुर्लक्ष करणे
अनेकदा पार्टनरच्या शोधात त्या व्यक्तीच्या स्वभावाला फार महत्त्वच दिलं जात नाही. मुलगा किंवा मुलगी हे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही की, समोरचा व्यक्ती किती प्रेमळ आणि किती जुळवून घेणारा आहे, कोणताही अट न घालता आपल्याला सपोर्ट करणारा आहे का? अनेकजण बोलण्यावरही लक्ष देत नाहीत. पण हे कोणत्याही नात्यासाठी महत्त्वाचं आहे.