लहान मुले ओल्या मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात, जसा आकार देऊ तसे ते घडतात, असे म्हणतात. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्य दिशेनं व्हावा, यासाठी याच वयात त्यांना पैलू पाडण्याचं कार्य कटाक्षानं प्रत्येक पालक करतात. याचदरम्यान, त्यांना वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींप्रति आदरभाव, प्रेम व्यक्त करण्याचेही धडे दिले जातात. पण कधी-कधी या शिस्तीचा काही पालकांकडून अगदीच अतिरेक केला जातो. नातेवाईक घरी आल्यावर किंवा कौटुंबिक सोहळ्यामध्ये काही पालक आपल्या मुलांना नातेवाईकांना मिठी मारायला लावणे, पापी द्यायला सांगणे यांसारख्या शारीरिक संवादाद्वारे त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जबरदस्ती करत असतात.
काही पालक तर अगदी हद्दच करतात. 'ते काका-काकी फक्त आणि फक्त तुला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आपल्या घरी आले आहेत किंवा कृपा करुन माझ्यासाठी त्यांना एक पापी दे', अशी भावनिक डायलॉगबाजी करत पालक मुलांना अक्षरशः ब्लॅकमेल करतात. कहर म्हणजे पालकांचा हा इमोशनल अत्याचार केवळ नातेवाईकांपुरताच मर्यादित नसतो तर ज्यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, असे नातेवाईक आणि मित्रपरिवारांसमोरही पालकांकडून 'पापी दे, मिठी दे' असा कित्ता वारंवार गिरवला जातो.
(लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स)
मुलांना सतत असं काही तरी करायला लावून तुम्ही शिस्त लावताय,खूप चांगले संस्कार करत आहात, असे वाटत असेल तर तो तुमचा केवळ गैरसमज आहे. कारण, मुलांच्या संमतीशिवायच त्यांना एखाद्याला मिठी मारायला सांगून, पापी द्यायला लावून तुम्ही स्वतःच त्यांच्या शारीरिक सुरक्षिततेत बाधा निर्माण करत आहात. त्यांचे नुकसान करत आहात. शारीरिक सुरक्षिततेच्या नियमांसंबंधित तुम्ही स्वतःच आपल्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण करत आहात. एकीकडे तुम्ही मुलांना सांगता की, तुमच्या शरीरावर फक्त तुमचा अधिकार आहे आणि परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही काहीही करण्यास सांगू शकत नाही. दुसरीकडे, त्यांच्याच संमतीविना इतरांना शारीरिक संवादाद्वारे आदरभाव व्यक्त करण्याची सक्ती केली जाते, हा पूर्णतः विरोधाभास आहे.
(पालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना!)
आपल्या संमतीशिवाय कोणीही आपल्याला स्पर्श करू शकत नाही आणि दुसऱ्यांनी तोंडाने सांगितल्याशिवाय त्यांना बोटही लावायचे नाही, हे लहान मुलांना समजावून सांगणं अत्यावश्यक आहे. लहानग्यांची संमती असणं हे कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे, यामुळे लैंगिक अत्याचार आणि प्राणघातक हल्ला, यांसारखे सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. मुलांवर संस्कार करताना, घडवताना त्यांना नियमानं सांगा की, कोणालाही मिठी मारणे, पापी देण्यास तुम्ही बांधलेले नाहीत. याची सुरुवात तुम्ही स्वतःच्या कुटुंबातून करा.
स्वतःच्याच कुटुंबात हा नियम पाळताना थोड्या बहुत प्रमाणात सुरुवातीस कदाचित कठीण जाऊ शकते. कारण बऱ्याचदा कुटुंबातील मोठ्यांना लहानांकडून कोणत्याही गोष्टीसाठी संमती मागण्याची सवय नसते. उदाहरणार्थ समजा, नातेवाईक तुमच्या मुलाला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आवडत नसल्याने तो मिठी मारणं टाळतोय?, तर यावेळेस तुम्ही काय कराल?. ही विचित्र परिस्थिती टाळण्यासाठी पालकांनी पुढे येऊन मध्यस्थी करावी आणि म्हणावं, 'ठीक आहे पुढच्या वेळेस त्यांना मिठी मार किंवा मिठी मारायची नसेल तर त्यांच्यासोबत हस्तांदोलन (shake hands) कर', असं म्हणत तुम्ही स्वतःच आपल्या मुलांच्या मदतीला धावून जावे.
मोठ्या व्यक्तींप्रति आदरभाव, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी केवळ प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या मुलांनी शारीरिक संवादच साधला पाहिजे,असा कुठेही नियम नाहीय. त्याऐवजी मुलं नातेवाईकांना एखादी कविता म्हणून दाखवू शकतात, चित्र काढून दाखवू शकतात किंवा आवडीची एखादी गोष्टही ते करू शकतात. पण हे सर्वदेखील त्यांची संमती असेल तरच, त्यामुळे लक्षात ठेवा नो जबरदस्ती अॅट ऑल.