- माधुरी पेठकरमूल जन्माला येण्याआधी मोठी तयारी केली जाते. त्याच्या स्वागतसाठी कपडे, खेळणी आधीच हजर करून ठेवली जातात.खेळणी आणि मूल यांचा खूप जवळचा असतो. घरात मुलं म्हटली की खेळणीचा पसारा हवाच.तान्ह्या बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकालाच खेळणी हवी असते. खेळण्यांसोबत खेळतांना मुलं मनानं आणि शरीरानंही वाढत असतात. इतकंच नाही तर मुलांच भावविश्व खेळण्यांशी जोडलेलं असतं. त्यामुळे खेळणी ही जरी मुलांचं मन रमवण्यासाठी असली तरी ती निवडताना खूप काळजी घ्यावी लागते.
* लहान मुलांसाठी खेळणी घेताना त्यावर विशिष्ट वयाची अट दिलेली असते. ही अट त्या खेळण्यांच्या स्वरूपामुळे असते. अनेक खेळण्या या लगेच तुटू शकतील अशा असतात, अनेक खेळण्यांमध्ये अनेक छोटे पार्टस असतात जे मुलं लगेच तोंडात घालण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त खेळण्यांवर वयाची बंधनं घातली आहेत म्हणून मुलांना ते द्यायचं नाही असं नाही तर इतक्या लहान वयातल्या मुलांच्या हातात काय द्यायला हवं आणि काय द्यायला नको याचा विचार आई बाबांनी आधी करायला हवा.
* रांगत असलेल्या बाळांचं सर्वात आवडतं खेळणं असतं ते म्हणजे त्याची काळजी घेणारे आजी आजोबा, आई-बाबा, ताई-दादा. यांनी जास्तीत जास्त वेळ मुलांना देवून त्यांना गाणी ऐकवणं, गोष्टी सांगणं, त्यांच्याशी बसून आपडी थापडी सारखे छोटे खेळ खेळणं, त्यांना विविध आकार, रंग, चित्र दाखवून त्यांच्याशी गप्पा मारणं या गोष्टी त्यांना खूप आनंद देतात.
* मुलं जसशी मोठी होतात तशा त्यांच्या खेळण्यांच्या मागण्या वाढतात. पण मोठ्या मुलांसाठी खेळण्या निवडतांना त्यांचे हट्ट पुरवताना त्यांचं वय आणि त्यांची गरज यांची सांगड घालणा-या खेळण्या निवडाव्यात. या गोष्टी पालकांना जाणीवपूर्वक कराव्या लागतील. बंदुका, गाड्या, बॅटरीवरच्या खेळण्या हे मुलांना कितीही मोठे झाले तरी लागतात. पण इथेच पालकांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. मुलांच्य बुध्दीला खाद्य मिळेल असं काही मुलांना या वयात देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा खेळण्या त्यांना द्यायला हव्यात. पझल्ससारखे खेळ जे मुलं एकटे आणि मिळून खेळतील असे खेळ जाणीवपूर्वक मुलांना द्यावेत. एकदा का मुलांना अशा खेळण्यांची गोडी लागली की आपोआप त्यांच्याकडून अशाच खेळण्यांची मागणी वाढते.
* प्रत्येकवेळेस मुलांना खेळण्या विकतच आणून द्यायची गरज नाही. हल्ली खेळ्ण्यांच्या लायब्ररीज चालवल्या जातात. अशा टॉय लायब्ररींचं सभासदत्व घेवूनही मुलांसाठी नियमितपणे नवीन खेळण्या देता येतील अशी व्यवस्था करता येते. तशीही मुलांची खेळण्यांबद्दलची उत्सुकता एक दोन दिवसात तर कधी काही तासात शमते. लगेच त्यांना नवं खेळणं हवं असतं. अशी नव्याची मागणी या टॉय लायब्ररीज सहज पूर्ण करतात. अशा लायब्ररीतून मुलांच्या बुध्दी आणि कौशल्यांचा विकास होईल अशा खेळण्या उपलब्ध होतात.
* महागडी खेळणीच चांगली खेळणी असं काही सूत्र नाही. आणि खेळण्या दुकानातच मिळतात असा काही नियम नाही. घरातल्या न लागणा-या वस्तूंपासूनही खेळण्या बनवता येतात. फक्त खेळण्यांसाठी वस्तू पुरवताना त्या मुलांसाठी हानिकारक नाही ना एवढं पाहायला हवं. शिवाय अशा होममेड खेळण्यांमुळे ‘कबाड से जुगाड’चा विचार मुलांमध्ये रूजायला मदत होते.* शाळेत जाणा-या मुलांसोबत पेपर आणि मासिकं यांच्या वाचनातून रंजक आणि माहितीपूर्ण खेळ पालकांना खेळता येवू शकतात. अशा खेळांमधून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. शिवाय त्यांना आपण माहिती मिळवण्यासाठी वाचतोय असं दडपण निर्माण न होता आपण खेळण्यासठी वाचतोय ही आनंदी भावना निर्माण होते. आणि अशा खेळण्यातून केलेलं वाचन मुलांच्या चांगलं लक्षातही राहातं.
* वाढत्या वयातही मुलांना खेळण्यातल्या बंदुका, रायफल, तलवार असे शस्त्र खेळ आवडत असतात. मात्र ते खेळ म्हणूनच मुलांनी खेळायला हवेत. एकमेकांसोबत खेळतांना मुलं जर ती एकमेकांना घाबरवण्यासाठी, रडवण्यासाठी खेळत असतील तर मुलांशी याबाबतीत बोलायला हवं. असे खेळ खेळूच नका, अशा खेळणी मिळणार नाहीत अशी बंधंनं मुलांवर घातली तर मुलं तीच खेळणी मागतील किंवा कुठूनही मिळून तशाच पध्दतीनं खेळतील. त्यापेक्षा असं खेळल्यानं काय होतं? याबद्द्ल मुलांशी बोललं तर हवा असलेला परिणाम होतो.
* बाहुल्या म्हणजे साधा खेळ असं जर कोणाला वाटत असेल तर थांबा आणि नीट विचार करा. हल्ली बाहुल्याही एकदम सेक्सी आणि फॅशनेबल लुकच्या मिळतात. अशा बाहुल्यांसोबत खेळतांना खासकरून मुलींच्या मनात सौंदर्याची एक वेगळीच व्याख्या रूतून बसू शकते. अशा बाहुल्यांसारखं फॅशनेबल, सेक्सी किंवा त्यांच्यासारखी स्लीमट्रीम फिगर असली तरच सुंदर दिसता येतं. अशा विचारातून स्वत:विषयीछा तिरस्कारही त्यातून विकसित होवू शकतो. अशी काही लक्षण दिसत असतील तर खेळण्यांबद्दल आणि मुली करत असलेल्या विचाराबद्दल पालकांनी मुलींशी बोलायला हवं
* खेळ म्हणजे शरीर आणि बुध्दीला चालना देणारं माध्यम. कम्प्युटर, मोबाईलवर खेळल्या जाणा-या खेळांना, व्हिडिओ गेम्सना ही व्याख्या लागू होत नाही. हे खेळ खेळून मुलांचा शारीरिक,बौध्दिक विकास होत नाही की त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत नाही तेव्हा मुलं जर असे खेळ खेळत असतील तर मुलांना या खेळांपेक्षा इतर उपयुक्त खेळ खेळण्याकडे वळवायला हवं. हे कामही जोरजबरदस्ती किंवा अतिरेकी नियम लादून होत नाही. इथेही मुलांशी सतत अर्थपूर्ण संवाद साधावा लागतो. आणि त्यांचं मन स्क्रीन टाइप खेळावरून इतर चांगल्या खेळांकडे वळवावं लागतं.