थोडसं प्रेम, थोडी भांडणं आणि थोड्या विश्वासाच्या जोरावर नातं उभं असतं. अनेकदा या नात्यामध्ये दररोज एकमेकांना समजून घेणारी जोडपीही एखाद्या लहान मुलांप्रमाणे भांडू लागतात. दोघांच्या खांद्यावर समान भार असेलेलं हे नातं आवश्यक नाही की नेहमी एकाच सरळ रस्त्याने चालावं. जोडप्यांमध्ये जेव्हा वैचारिक असमानता येते त्यावेळी नात्यांची गाडी अडखळते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका रिसर्चमधून या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे की, छोट्या छोट्या गोष्टींवर एकमेकांशी भांडणारी जोडपी इतर जोडप्यांपेक्षा जास्त खुश असतात.
खुश आणि इमानदार असतात ही जोडपी
रिलेशनशिपमध्ये लोकांच्या राहणीमानावरून संशोधकांनी एक सर्वे केला होता. यामध्ये अनेक लोकांना त्यांच्या नात्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. यामधून असं लक्षात आलं की, ज्या जोडप्यांमध्ये भांडणं होतात. ती जोडपी भांडणं न होणाऱ्या जोडप्यांपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त खूश असतात. कारण भांडणं न होणाऱ्या लोकांमधील जास्तीत जास्त लोकं आपल्या पार्टनरपासून अनेक गोष्टी लपवत असतात.
अनेकदा एखाद्या गंभीर विषयाला टाळत राहिल्याने जोडप्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्याचबरोबर एकमेकांवरील विश्वास कमी होतो. समस्यांचा सामना केल्याने किंवा त्यावर उपाय केल्यानेच त्यावर तोडगा निघतो. यावर दुर्लक्ष केल्यामुळे नात्यामध्ये फुट पडण्याची शक्यता असते.
नातं वाचवण्यासाठी एकमेकांशी बोला
'क्रूशियल कन्वर्सेशन' या पुस्तकाचे सह-लेखक जोसेफ ग्रेनी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, नात्यामध्ये जोडप्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे, ते एकमेकांशी एखाद्या समस्येवर खुलेपणाने चर्चा करत नाहीत. नात्यामध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर त्यावर दोघांनी एकत्र बोलून त्यातून मार्ग काढला पाहिजे. गोष्टी लपवण्याने नात्यांमध्ये मोकळेपणा राहत नाही. त्यांनी सांगितले की, अनेकांना अशी भिती सतावत असते की, जर नात्यांमध्ये येणाऱ्या समस्यांवर बोललं गेलं नाही तर नातं तुटण्याचीही शक्यता असते.
ग्रेनी यांनी सांगितले की, काही लोकं आपल्या भावनात्मक अस्थिरतेचा दोष दुसऱ्यांना देतात. दरम्यान, अशा व्यक्ती स्वतःलाच व्यवस्थित समजून घेवू शकत नाहीत. त्यामुळे कळत नकळत त्या आपल्या पार्टनरला दुःखी करतात.
या सर्वेमध्ये जेवढ्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या त्यांच्यापैकी 99 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, एकमेकांशी न बोलणं आणि एकमेकांपासून गोष्टी लपवणं यांमुळे त्यांच्या नात्यामध्ये फूट पडू शकते. जोडप्यांमध्ये नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होऊ शकतात.