- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई
कोणत्याही नात्यात मुरलेपण यायचे असेल तर त्यासाठी दीर्घकालीन सहवास असणे गरजेचे असते. परस्परांचा गुणदोषांसह स्वीकार, ही या मुरलेल्या नात्याची पहिली अट. नवरा-बायकोच्या नात्यात हे असे पाहायला मिळते. मात्र, आताशा लग्नसंस्था उद्ध्वस्त होते की काय, अशी शंका येण्याइतपत ही घट्ट नात्यांची वीण उसवू लागली आहे. तात्कालिक वा क्षुल्लक कारणांवरून काडीमोडाच्या घटना वरचेवर घडू लागल्या आहेत. कोविडोत्तर काळानंतर त्यात भरीव वाढ झाली आहे. म्हणूनच मिलेनियलनंतरची पिढी - जिला ‘जनरेशन झेड’ (लघुरूप : जेन झी) असे संबोधले जाते - कोणत्याही नात्यात पूर्ण समर्पित होण्यासाठी फारशी उत्सुक नसते. हेही कोविडोत्तर काळातलेच निरीक्षण. ‘जनरेशन झेड’च्या या वृत्तीला हेजिडेटिंग असे संबोधले जाते.
एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडली की त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. तिच्याशी संवाद वाढवावासा वाटू लागते. एक हुरहूर लागून राहते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताना ही सारी लक्षणे दिसू लागतात. मात्र, ‘जनरेशन झेड’ची वृत्तीच वेगळी. आपल्या आवडत्या व्यक्तीशी नातेसंबंधांच्या बंधनात अडकणे त्यांना मंजूर नाही. त्यातील समर्पित भावनेसाठी ते तयार नाहीत. म्हणूनच अशा प्रकारच्या भावना निर्माण झाल्या की ते स्वत:च गोंधळून जातात. विशेषत: कोरोना महासाथीच्या फेऱ्यानंतर यात विलक्षण वाढ झाली आहे. कोरोनाने सर्व जगाचे व्यवहार ठप्प केले होते. घरात सर्व जण कोंडले गेले होते.
या सक्तीच्या कोंडमाऱ्यात नात्यांचाही कोंडमारा झाला. तोंडावरच्या मास्कखाली चेहऱ्यावरचे भाव आपसूक लपले. त्यामुळे परस्परांविषयी अविश्वास निर्माण झाला. सर्व काही नॉर्मल झाल्यानंतरही या भावना मात्र तशाच राहिल्या. म्हणूनच कोणत्याही नव्या नात्याला सुरुवात करायला ‘जेन झी’ पटकन तयार होत नाही, असे निरीक्षण समाजशास्त्र अभ्यासकांनी मांडले आहे. नात्यातला कोरडेपणा ते जपतात. सरसकट सर्वच नवतरुण अशा स्वभावाचे असतात असे नाही. अनेक सन्माननीय अपवाद यास असतीलही. मात्र, अनेक नव तरुणांमध्ये ‘नकोच ते रिलेशनशिपचे लफडे’, ही भावना बळावत चालली आहे, हे नक्की. म्हणूनच हेजिडेटिंगचे पारडे जड होत चालले आहे..