(Image Credit: www.aconsciousrethink.com)
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला ते प्रेम सांगणं यापेक्षा कठीण काय असू शकतं? कदाचित, माझं तुझ्यावर प्रेम नाही, हे त्या व्यक्तीला सांगणं ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे. काही लोक हे त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी काही महिने, काही वर्ष वेळ घेतात. पण त्यांचं हे प्रेम त्यांना न दुखवता नाकारणं ही सुद्धा एक कला आहे.
एकतर तुम्ही त्या व्यक्तीला थेट नाही म्हणू शकता किंवा त्याला वाईट वाटू नये म्हणून त्याला खोटंही सांगू शकता. पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काहीच फिलिंग्स नाहीत अशा व्यक्तीसोबत खोटं नातं ठेवावं याहून काय त्रासदायक असू शकतं. त्यामुळे ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम नाहीये आणि त्या व्यक्तीने तुम्हाला प्रपोज केला तर त्याला नाही म्हणा. पण नाही म्हणण्याचीही एक पध्दत असायला हवी.
1) आधी त्याचं/तिचं म्हणनं ऐकून घ्या
हे लक्षात ठेवा की, समोरच्या व्यक्तीने त्याचं तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काही महिने किंवा काही वर्ष वाट पाहिली आहे. तुम्ही त्याच्या/तिच्या या भावनांचा आदर करायला हवा. त्याच्यावर थेट बंदुक तानण्यापेक्षा आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा त्याला/तिला काय बोलायचे आहे हे आधी शांतपणे ऐकून घ्यायला हवे. त्यानंतर विचार करुन शांतपणे तुम्ही बोलायला हवे.
2) भावनांशी प्रामाणिक राहा
एखाद्या व्यक्तीला नाही म्हणने खासकरुन जवळच्या व्यक्तींना, फार कठीण असतं. पण खोटं नातं जोपासत बसण्यापेक्षा स्वत:शी प्रामाणिक वागलेलं कधीही चांगलं. त्यामुळे उगाच चिडचिड करण्यापेक्षा त्या व्यक्तीचं ऐका आणि नंतर तुमचं उत्तर द्या. खोटं नातं निर्माण करुन पुढे पश्चातापाशिवाय काही मिळणार नाही.
3) खोटी आशा निर्माण करु नका
जर तुम्हाला माहीत आहे की, समोरच्या व्यक्तीवर तुमचं प्रेम नाहीये, तर त्या व्यक्तीला उगाच खोटी आशा दाखवू नका. उगाच विचार करते किंवा करतो असे सांगू नका. अनेकजण ही चूक करतात. काही लोक हे समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून 'नाही' म्हणण्यास घाबरतात. पण तुम्ही तुमचं उत्तर देण्यास उशीर कराल तर तुमच्यावर प्रेम करणारी समोरची व्यक्ती तुमच्या शांततेला सकारात्मक समजणार.
4) चिडू नका
असंही होऊ शकतं की, काहीही ध्यानीमनी नसताना तुम्हाला प्रपोजचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कदाचित तुमची पहिली रिअॅक्शन ही राग असू शकते. अशावेळी रागावणे चुकीचे आहे. परिस्थीती काय आहे हे आधी समजून घ्या. नाही तर त्या व्यक्तीला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे त्याच्या किंवा तिच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
5) मैत्रीमध्ये एक सीमा ठेवा
अनेकदा मैत्रीमध्ये नकळत काही गोष्टी बोलल्या जातात, केल्या जातात. पण त्याला प्रेमाचे नाव देणे योग्य नाही. अशावेळी आधीच कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून एक सीमा आखून घेतल्यास परिस्थीती हाताबाहेर जाणार नाही.