कोणतंही नातं हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतं, असं आपण नेहमी ऐकतो. आयुष्याच्या वाटेवर दोघांनाही एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. आपण अनेकदा ऐकतो की, दिर्घायुषी होण्यासाठी खुश राहणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, दिर्घायुषी होण्यासाठी खुश राहण्यासोबतच आपल्या जोडीदाराचंही खुश असणं गरजेचं आहे. जोडीदार खुश असेल तर तुम्हीही खुश आणि निरोगी राहता.
नेदरलँड्सच्या टिलबुर्ग युनिवर्सिटीमध्ये संशोधकांनी ओल्गा स्तावरोवा यांनी सांगितले की, ‘हे संशोधनातून व्यक्तीच्या आरोग्यासोबतच त्यांच्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचाही अभ्यास केला आहे.’ सायकोलॉजिकल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ज्या लोकांचे जोडीदार आयुष्यामध्ये खुश असतील तर ते स्वतः आपल्या आयुष्यामध्ये खुश असतात.
स्तावरोवा यांनी सांगितले की, जर तुमचा जोडीदार डिप्रेशनमध्ये आहे आणि संध्याकाळच्यावेळी टीव्हीसमोर बसून चिप्स खाणं पसंत करत असेल तर तुमचीही संध्याकाळ काहीशी डिप्रेशनमध्येच जाण्याची शक्यता आहे. स्तावरोवा यांनी सांगितले की, या संशोधनामधून अमेरिकेतील जवळपास 4400 जोडप्यांवर संशोधन करण्यात आले, ज्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त होतं.
संशोधनाचे आकडे एकत्र केल्यानंतर 8 वर्षांनंतर जवळपास 16 टक्के सहभागी झालेल्या लोकांचा मृत्यू झाला होता. ज्या लोकांचं निधन झालं होतं, ते जीवंत असलेल्या लोकांच्या तुलनेत वृद्ध, कमी शिकलेले, मध्यम वर्गीय, शारीरिक स्वरूपात कमी सक्रिय आणि खराब जीवनशैली असणारे होते. तसेच जीवंत असणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये संबंध आणि जीवनामध्ये कमी संतुष्ट होते आणि त्यांचे जोडीदारही कमी संतुष्ट होते. संशोधनामध्ये असं सिद्ध झालं की, ज्या लोकांचे जोडीदार संशोधनाच्या सुरुवातीला आपल्या आयुष्यात संतुष्ट होते, त्यांच्या मरण्याचा धोका अपेक्षेपेक्षा कमी होता.