- नितीन राणे महिन्यातला पहिलाच सोमवार असल्यामुळे स्टेशनवर बेफाम गर्दी होती. माझा पहिल्या वर्गाचा पास होता. पण क्लास कोणताही असो गर्दीचा त्रास होतोच होतो. मी दादर स्टेशनला उभी होते. बाबांनी हजारदा बजावल्यावर मी पहिल्या वर्गाचा पास काढला होता. मला हे मुळी पटलेच नव्हते. तिप्पट पैसे मोजून पण सीट मिळत नसे.
ट्रेन प्लॅटफॉर्मला आली तशी सगळ्यांची गर्दी झाली. आत शिरायला मिळेना. रेटारेटी झाली. मी सर्वांना ढकलून आत चढायचा प्रयत्न करू लागले. जेमतेम दरवाजाचा दांडा हातात मिळाला. ट्रेन सुटायला लागली. प्लेटफॉर्मवरून एक सावळीशी मुलगी आत चढायला बघू लागली. मला तिचा राग आला. ट्रेन एवढी खचाखच भरलेली असताना ती त्यात चढायचा प्रयत्न करत होती. मी मुद्दाम दारातच राहीले. ती 'मला कर्जतला जायचे आहे प्लीज आत चला' अशी ओरडत होती. दरवाज्यामधील दोन तीन बायका तिच्यावर ओरडल्या. त्यात मी पण तिच्यावर तोंडसुख घेतलं. गाडी चालू असताना सुद्धा ती मुलगी त्या डब्याच्या मागे धावत होती. शेवटी गाडीने वेग घेतला. मी पुढच्या स्टेशनला आत आले. बसायला जागा नव्हतीच. मी आतल्या पॅसेजमध्ये उभी राहीले. मी एकटीच उभी असल्यामुळे बाजुच्या डब्यातून पुरूषांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. त्याकडे दुर्लक्ष करत मी मोबाईलमध्ये मुव्ही बघत राहिले. काही वेळाने पुरूष डब्यात गोंधळ उडाला. थोडे वाकून पाहिल्यावर कळले की सामान ठेवायच्या रॅकवर दोन बांधून ठेवलेले फणस , दोरी तुटल्यामुळे एकाच्या डोक्यावर पडले होते. तो भयंकर चिडला होता. सगळेजण हसत होते. ज्याचे फणस होते तो त्यांना समजावत होता पण ते समजून घेत नव्हते. शेवटी त्या तरूणाने त्यातला एक फणस, फणस डोक्यावर पडलेल्या माणसाला देऊ केला तेव्हा कुठे तो शांत झाला. माझ्या मनात आले, हेच लेडीज डब्यात झाले असते तर? कल्पनाच न केलेली बरी. मी विचार झटकून परत मोबाईल मध्ये गुंतले. त्या डब्यात काही लोक फणसावरून कमेंट पास करत होते आणि आम्ही हसतोय का याची वाट बघत होते. तो तरूण मात्र परत पुस्तक वाचण्यात मग्न झाला. त्याचा शांतपणा मला खुप आवडला. त्याची काहीही चुक नसताना क्लेश टाळण्यासाठी त्याने घेतलेला नम्रपणा मला आवडला. माझं स्टेशन आलं तशी मी उतरून गेले.
माझी ती ट्रेन ठरलेली असायची. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही नेहमीप्रमाणे त्या ट्रेनला खुप गर्दी झाली. कालची मुलगी आज मात्र माझ्याअगोदर चढली होती. माझं लक्ष जेन्ट्सच्या डब्यात गेले. कालचा फणसवाला तरूण पुस्तक वाचण्यात मग्न होता. काळेभोर कुरळे केस, रूंद कपाळ, रंग सावळा पण एखाद्या टिव्ही मालिकेतील हीरोसारखे त्याचे व्यक्तीमत्व होते. ट्रेनमध्ये एवढा आवाज होता तरी तो एकाग्रपणे वाचनात तल्लीन होता. कोणास ठाऊक मला त्याच्याकडे पाहून स्वतःची कीव आली. आपण काही वेळ सोडला तर सतत मोबाईलला चिकटलेलो असतो. शाळेत असताना आपण किती वाचायचो आणि आता व्हॉट्सअपवरच्या मेसेजेस शिवाय वाचन शुन्य. दुसऱ्या दिवशीच मी लायब्ररी लावली. माझ्या आवडते लेखक व पु काळे यांचे पुस्तक घेऊन आले.
दिवसामागून दिवस जात होते. ती कर्जतवाली मुलगी कधीकधी प्लॅटफॉर्मलाच राहू लागली. मला तिचा राग यायचा. कारण महिनाभरापूर्वी सेकंडक्लास मध्ये आम्ही सीट वरून भांडलो होतो आणि गंमत अशी की गर्दीला कंटाळून योगायोगाने त्यानंतरचा मासिक पास दोघांनीही फर्स्ट क्लासचा काढलेला. त्यामुळे आमची गाठ वारंवार पडत होती. तिला ट्रेन पकडता आली नाही की मला आसुरी आनंद व्हायचा. तो तरूण देखील तीच ट्रेन पकडायचा. त्याचा आणि माझा नित्यक्रम सुट्टी व्यतिरिक्त कधी चुकला नाही. मला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटत होते की त्याने एकदाही लेडीज डब्यात डोकावलेले मी तरी पाहीले नव्हते. खरंतर तो मला दादर ते ठाणे दरम्यानच नीट दिसायचा. ठाणे आले की त्याला सीट मिळायची आणि पुढे कुठे उतरायचा ते देखील माहीत नव्हते. एके दिवशी मला सीट मिळाली नाही पण त्याला जवळून पाहता येईल असे खिडकीजवळ उभे राहता आले. तो कसले तरी जाड पुस्तक वाचत होता. दोन्ही डब्याच्या मधल्या दांडीला हात पकडून तो वाचत होता. त्याच वेळी मी व पु काळेंची 'पार्टनर' ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली होती. माझे कुतुहल जागे झाले. त्याच्याशी मला बोलावेसे वाटत होते. पण कसे तेच कळत नव्हते. एकदा शुक शुक करून पाहिले पण त्याच्या ऐवजी दुसरेच लोक बघायला लागले. मी तो नाद सोडून दिला. थोड्यावेळाने धीर करून त्याच्या बोटाला हात लावला. अनपेक्षीत झालेल्या माझ्या स्पर्शाने तो चमकला. त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर पडलेला प्रश्न पाहून मी त्याला विचारले."आज कोणते पुस्तक वाचतो आहेस""पॅपिलॉन" "ओह. कादंबरी आहे का?""नाही, एका कैद्याचे आत्मकथन आहे, खुप इंटरेस्टींग आहे" तो म्हणाला."पुस्तक थोडा वेळ पहायला देता का?""शुअर" असे बोलून त्याने ते पुस्तक मला देऊ केले पण डब्याच्या मधल्या स्टीलच्या दांड्यातील कमी अंतरामुळे ते जाड पुस्तक काही माझ्याकडे येईना. "राहू दे, नाही येणार ते. फक्त मला फोटो काढता येईल असे पकडून ठेवा. मी फोटो काढते." मी त्या पुस्तकाच्या कव्हर पेजचा फोटो काढला. त्याने परत पुस्तकात डोके खुपसले. खरंतर मला त्याच्याशी अजून बोलायचं होतं.
डोंबिवली आली तशी मी उतरून गेले. त्या दिवसापासून मात्र एक मनासारखी गोष्ट घडली. मी दादरला चढले की नाही हे तो नोटीस करायचा. तेवढाच त्याचा कटाक्ष मला सुखावून जायचा. अंग मोहरून यायचे. असं का होतंय असं मला अजिबात वाटलं नाही. कारण मला माहीत होते की मी त्याच्या प्रेमात पडले होते. अजून मला त्याचे नावही माहीत नव्हते. काय करतो, कुठे राहतो याची काहीच कल्पना नव्हती. माझ्या एकतर्फी प्रेमाची गाडी अशीच पुढे चालली होती. तो फक्त गाडीची दखल घेत होता. गाडीत चढत मात्र नव्हता. पण मला आशा होती तो एक दिवस नक्की येईल. त्याचा आणि माझा प्रवासाचा मुक्काम एक असेल.
एके दिवशी त्याची नजर मला शोधताना दिसली नाही. पहिल्यांदा मी तो आलाय की नाही हे पाहण्यासाठी सगळ्यांना रेटत आत येऊ लागले. पण तो कुठेच दिसला नाही. मी खुप नाराज झाले.
दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याच्या आठवणीने मी खुप बेजार झाले होते. त्याला लवकरात लवकर माझ्या मनातलं सर्व सांगायला हवं. पण तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल? त्याच्याही मनात माझ्याबद्दल काही असेल का? मला प्रश्नावर प्रश्न पडत होते. त्या दोन रात्री कुशी बदलण्यात गेल्या. नाव माहीत नसल्यामुळे फेसबुकला पण शोधू शकत नव्हते आणि तो फेसबुकवर असेल असेही वाटत नव्हते. आठवड्यातला शेवटचा दिवस होता. मी दादरला ट्रेन मध्ये चढले. नेहमीच्या जागेवर माझी नजर गेली. तो आला होता. त्याची आणि माझी नजरानजर झाली. त्याने दिलेल्या स्माईलला मी मात्र लटका राग दाखवला. त्याने परत हसण्याचा प्रयत्न केला. पण मी मात्र कुसक्यासारखी रूसून बसले. नंतर तो परत पुस्तकात रमला आणि माझ्या रूसव्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुळात मी रूसले आहे हेच त्याला कळले नसणार. ट्रेन रिकामी असल्यामुळे मी आत आले होते. तो वाचनात मग्न होता. त्याच्या बोटाला झालेल्या माझ्या स्पर्शाने त्याने माझ्याकडे पाहीले. मी एक कागदाचा चिटोरा त्याच्या हातात इतक्या बेमालूपणे दिला की कोणालाच काही कळले नाही. पण त्या कर्जतवाल्या मुलीने मात्र पाहिले. मी तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. आमचे कधीतरी पुस्तकावरून बोलणे व्हायचे हे दोन्ही डब्यातल्या लोकांना माहीत होते.
तो कल्याणला उतरून प्लॅटफॉर्मवर थांबला होता. मी मुद्दामच त्याला मी उतरते त्या पुढील स्टेशनला थांबायला सांगीतले. ट्रेनमध्ये बिनधास्त विचार करणारी मी, पण प्रत्यक्षात जेव्हा त्याला भेटायचे आले तेव्हा मात्र मला कापरे भरले.आम्ही स्टेशन जवळच्या हॉटेलमध्ये बसलो. तो अबोल आणि काहीसा लाजरा होता. पण विचारी होता. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. नावाप्रमाणेच श्याम होता. आमचे बोलणे पुस्तकांभोवतीच फिरतेय पाहून माझी चुळबूळ वाढली होती. त्याला माझ्या मनातले भाव सांगायला धीरच होत नव्हता. इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारली. बोलण्यातून ते त्याचे बॉस असावेत असे वाटत होते. थोडा वेळ त्यांचे बोलणे झाल्यावर तो मला बाय करून त्याच्या बॉससोबत निघून गेला. बिल द्यायचे मात्र विसरला नाही. मी जागीच थिजले. यावरून मला एक कळले. त्याच्या मनात माझ्या विषयी काहीही नाहीये.आजकालच्या संधीसाधू दुनियेत तो वेगळा होता. माझा श्याम. खरचं माझा होईल का? आतापर्यंत कोणालाच भाव न देणारी मी आज का अशी पागल झाले आहे? विचारात गुरफटतच मी बाहेर पडले.दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे तो दिसणार नव्हता. त्याला न पाहता एक दिवस काढणेही मला जड जाऊ लागले. सेल्फी जरी काढता आला नसला तरी मी त्याचा फोटो मात्र त्याला न कळत काढला होता आणि तोच फोटो मला विरहात साथ देत होता.
सोमवारी रोजच्या प्रमाणे मी दादरला चढले. त्याच्या डब्यात डोकावून पाहिले तर तो नव्हता. त्याच्या ठीकाणी दुसराच मुलगा उभा होता आणि तो माझ्या कडे पाहून हसत होता. मला त्याचा भयंकर राग आला. थोड्यावेळाने मी आत आले तर श्याम सीटवर बसला होता. त्याला पाहताच भर रणरणत्या वाळवंटात आपल्या चेहऱ्यावर कोणीतरी पाण्याचा फवारा मारावा तशी मी फ्रेश झाले. माझी कळी खुलली. पण ती खुललेली कळी श्याम पाहत नव्हता. त्यामुळे त्याला काहीच अर्थ नव्हता. किंबहूना श्यामला काही फरक पडत नव्हता. त्या दिवशी पण त्याला भेटण्याची इच्छा झाली पण मी स्वतःला सावरले.
दुसऱ्या दिवशी तो परत गायब झाला. माणसाने सांगून तरी जावं ना. असं अचानक गायब होऊन माझी हालत मात्र खराब करत होता. मी खुप बैचेन झाले. माझी बैचेनी मी आईला सांगितली. तेव्हा थोडं बरं वाटले. मन हलकं झालं. असेच दोन तीन दिवस तो गायब होता. तिसऱ्या दिवशी व्हॉटसपवर एक मेसेज आला आणि मी हादरून गेले. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार दाटला.
मी कर्जतला पोहोचले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. मी माझ्या जवळचा पत्ता एका व्यक्तीला विचारला. मी लगेच रिक्षेने सांगितलेल्या पत्त्यावर निघाले. मी लायब्ररी जवळ पोहोचले तेव्हा ती बंद होती. ती चालू व्हायला अर्धा तास होता. मला तो अर्धा तासही मोठा वाटू लागला. शेवटी दहा वाजताची वेळ असलेली लायब्ररी सव्वा दहाला चालू झाली. मी तिथे गेले खरे पण मला हवी ती माहीती मिळायला अडचण येत होती. मी खुप विनंत्या केल्या पण तिथे काम करणारे कर्मचारी आपली ड्यूटी बजावत असताना मला माहीती द्यायला नकार देत होते. अशातच पाउण तास गेला. माझी चिकाटी पाहून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला. मी त्यांच्याशी बोलले. पण ते प्रत्यक्षात येऊनच मला माहिती द्यावी की नाही ठरवणार होते. थोड्या वेळात ते आल्यावरच मला हवी असलेली माहिती मिळाली. मी तिथून निघाले. उन वाढले होते. मी जिथे जाणार होते ते ठीकाण लायब्ररीपासून बरेच लांब होते. तिथे जाणारी बस यायला वेळ होता. माझ्याकडे तेवढी सहनशक्ति उरली नव्हती. मी रिक्षा करून निघाले. तिथे जाताना पायात कापरी भरली होती. रिक्षातून उतरल्यावर मी पत्ता विचारत विचारत जात होते. शेवटी ते ठिकाण आले. वाटेत ठिकठिकाणी फुलांसोबत पैसे पडलेले पाहून मला हुंदका आवरेना. पुढे गेल्यावर अंगणात बांबूच्या काठ्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. एका बाजूला पाण्याने भिजलेले अंगण, अंगणाच्या कोनात मांडलेली विटांची चुल , सारं काही मला अस्वस्थ करत होतं. घराच्या मागच्या बाजूला बायकांचा रडण्याचा आवाज येत होता. सर्व पाहून मला अंगणाच्या कोपऱ्यावरच चक्कर आली. मी खाली कोसळतेय एवढेच मला कळले.
डोळे उघडले तेव्हा मी एका कॉटवर होते. मी डोळे किलकिले करून पाहिले तर एक गृहस्थ मी शुद्धीवर यायची वाट बघत होते. मी शुद्धीवर आल्यावर त्यांनी मला एका ग्लासमधून लिंबूसरबत आणून दिले. पण मी ते घेतले नाही. त्यानी माझी विचारपुस केली. मी रडत रडत त्यांना सगळे काही सांगीतले. " पोरी रडू नकोस तुझा काहीतरी गैरसमज झालाय."" म्हणजे?" मी डोळे पुसत पुसत म्हणाले." चल , तुला सांगतो सगळे" असे बोलून त्यानी आपली अँक्टिवा बाहेर काढली. मला काहीच कळत नव्हते. मी यंत्रवत त्यांच्यासोबत निघाले. पण त्या अंगणातले दृश्य मात्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. देवाने माझ्याशी एवढे निष्ठूर वागायला नको होते. काही वेळात त्या काकानी आपली अँक्टीवा एका हॉस्पीटलजवळ थांबविली. मला काहीच कळत नव्हते. मी वेड्यासारखी त्यांच्या मागून जात होते. एका वॉर्ड जवळ येऊन ते थांबले आणि मला आत पाठविले. तो जनरल वॉर्ड होता. तिथे भरपुर पेशंट होते. मी वॉर्डच्या दरवाज्यापाशीच उभी होते. त्यांनी मला असं का सोडले तेच कळत नव्हते. मला सैरभैर झालेले पाहून तेच पुढे आले." पोरी तुझ्या उजव्या हाताच्या बाजूला थोडं पाहशील का?"मी माझ्या उजव्या बाजुला पाहीले . माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मगाशी जे वाचलं, जे पाहीलं ते खरं की आता पाहतेय ते खरं? मी हलकेच श्यामच्या पायाला चिमटा काढला. त्याने हलकेच पाय झाडला .श्याम अर्धवट झोपेत होता तो जागा झाला. मला पाहून तो आश्चर्यचकीत झाला होता."तू इकडे कुठे?"मी काहीच बोलले नाही. त्यावेळी मी माझ्या मनाचा कौल ऐकला आणि सगळ्यांसमोर तो झोपलेला असताना त्याला मिठी मारली. त्याने योग्य ते अंतर ठेवायचा प्रयत्न केला पण मी मात्र त्याला घट्ट बिलगले. त्याचा उबदार स्पर्श मला सुखावून गेला. क्षणभर तसाच गेला असेल. डॉक्टर राउंडला आले तशी मी बाजूला झाले. तो आणि त्याच्या घरातील सर्वजण माझ्याकडे पाहतच राहिले. माझ्या सोबत आलेले गृहस्थ मात्र गालात हसत होते. त्यानी मला बाहेर बोलविले. मला श्याम पासून दुर जायचे नव्हते पण चेकअप चालू असताना तिथे थांबू देत नव्हते.मी आणि ते गृहस्थ बाहेर आलो. समोर ती कर्जतवाली मुलगी उभी होती. मला आश्चर्य वाटले. "हाय शर्वरी, कशी आहेस?"माझ्या नावासकट हाक मारलेली पाहून मी आश्चर्यचकीत झाले. "माझं नाव तुला कसं माहीत?"बैस इथे, सांगते सर्व"मी यंत्रवत हॉस्पीटलच्या आवारातील सिमेंटच्या बाकड्यावर बसले. "मी श्यामची बहीण, स्नेहा. " हे ऐकून मी उडालेच."तुला इथे बघून माझा अंदाज खरा ठरला." असे बोलून स्नेहा मला अजून बुचकळ्यात पाडत होती."मला नीट सांगाल का? काय झालयं ते." मी काकुळतीला येऊन म्हणाले."तुला माहीती आहे का ,आमचा श्याम मोठ्या नशीबाने वाचलाय. त्या दिवशी श्याम आणि त्याचा मित्र शेखर त्या दोघांच्या मित्राला पहायला ठाण्यामध्ये हॉस्पीटलला गेले होते. त्या दिवशी मला तुम्हा सर्वांच्या कृपेमुळे ट्रेनमध्ये चढताच आले नाही. शेखर आणि श्याम आपली नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी ठाण्याला आले. ठाण्याला दादर पेक्षाही जास्त गर्दी होती. काहीही करून ती ट्रेन त्यांना पकडायची होती. ती कर्जत ट्रेन अशी आहे की एकदा का ती चुकली किंवा पकडता नाही आली की दिड तासाची निश्चिंती. तो वेळ वाचवण्यासाठी आमची धडपड असते. पण सगळीच लोकं समजूतदार नसतात ना. श्याम आणि शेखर पण वेळेत पोहोचण्यासाठी ती ट्रेन पकडायला गेले. पण त्यांना आत शिरता येत नव्हते. श्यामने कसाबसा दांडा पकडला. शेखर पण आत शिरण्यासाठी धडपडत होता. इतक्यात ट्रेन सुटली. शेखरने वरच्या पट्टीला पकडून एक पाय खाली टेकवला. त्याला कम्फर्टेबल वाटत नसावे. तो सर्वांना आत जायला सारखा ओरडत होता. त्याची विनवण्या कोणाच्या कानावर पडत नव्हत्या. पडत असल्या तरी आत चढलेल्या माणसाला बाहेर लटकणाऱ्याची खिसगिणतीही नव्हती. इतक्यात आतून बाहेरच्या बाजूला हलकासा दबाव आला आणि श्यामचा हात सुटला. त्याचा तोल शेखरवर जात दोघेही चालत्या ट्रेनमधून खाली पडले. त्यात शेखर हॉस्पीटलमध्ये दाखल करायच्या आत गेला. श्याम शेखरच्या अंगावर पडल्यामुळे वाचला. श्यामला पायाला झालेल्या किरकोळ दुखापतीखेरीज काही झाले नसल्यामुळे त्याने लगेच लोकांना बोलवून शेखरला कळवा हॉस्पीटलला घेऊन जात असताना त्याने वाटेतच प्राण सोडला." "पण व्हाट्सअँप वर काही वेगळेच वाचले" मी स्नेहाचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले."हो, व्हाट्सअँप वर फिरत असलेला मेसेज मी पण वाचला, शेखरऐवजी श्याम मृत्युमुखी पडला असे लिहीले होते. त्यामुळे तु इकडे आलीस. शेखरचे घर पण आमच्या घराच्या बाजूला आहे ,त्याचे पुढच्या महिन्यात लग्न होते. या सगळ्यासाठी श्याम स्वतःला दोष देतोय. त्याला वाटतेय की त्याचा हात सुटल्यामुळे दोघे पडले. हे खरं जरी असले तरी मला नाही तसं वाटत.""पोरीनो दोष आहे माणसाच्या मनोवृत्तीचा , आज काल कोणी, कोणाची पर्वा करेनासा झालाय. माणुसकी , समजूतदारपणा नाहीसा झालाय. ठाणे, डोंबिवली , कल्याणकरांसाठी बऱ्याच धीम्या गतीच्या ट्रेन्स असतात, पण काही लोक इच्छीत स्थळी लवकर पोहचण्यासाठी लांब पल्ल्याच्या फास्ट गाड्या पकडतात आणि अगदी बदलापुर ते कर्जत किंवा कसारा आसनगांव वरून रोज पोटाची खळगी भरणारे लोक मात्र खाली राहतात. जे जीवाच्या आकांताने आत घुसतात त्यांचे जीवन असे संपते. प्रत्येकाने थोडा विचार करायची गरज आहे. आपल्या पुरता विचार न करता दुसऱ्याचा विचार करायला हवा. नाहीतर या पुढे असे अनेक शेखर असे जीव तोडणार आहेत. शर्वरी तु म्हणशील एवढे जीव तोडून चढायची काय गरज आहे. गरज आहे म्हणून तर बिचारे चढतात. दूरवर राहणाऱ्या या लोकांचे घरही स्टेशनपासून जवळ नसते. तिथून त्यांना त्यांच्या गावी जायचे असते. त्यासाठीच हा सर्व आटापिटा चाललेला असतो. माझा एक खोपोलीवरून गोरेगांवपर्यंत ये जा करणारा मित्र आहे. तो खोपोलीला उतरून आपल्या गावाहून ये जा करत असतो."इतक्यात त्या गृहस्थांना कोणीतरी हाक मारली. ते निघून गेले मात्र माझ्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबता थांबत नव्हते. स्नेहाबद्दल मी केलेल्या वाईट विचाराबद्दल , कधी कधी टोचून बोलल्याबद्दल मला खुप अपराधी वाटत होतं. मी पहील्यांदा दुसऱ्याबद्दल विचार करत होते. माझा अश्रूंनी भिजलेला चेहरा हातात घेत स्नेहाने मला जवळ घेतले"शर्वरी , कोणी माणुस वाईट नसतो गं, फक्त त्याला जाणीव करून द्यायची गरज असते. काही माणसे तर सांगून पण ऐकत नसतात. त्यांचे डोळे असं काही गंभीर घडल्यावरच उघडतात. तु तशी नाही आहेस. श्याम मला तुझ्याबद्दल सगळं सांगायचा अगदी तुमच्या कल्याण भेटीबद्दलही बोललाय. त्याचेही तुझ्यावर प्रेम आहे पण पठ्ठ्याने स्वतःहून कधी विचारले नसते." स्नेहाच्या धीराने मला खुप हलकं हलकं वाटतं होते. इतक्यात श्यामचे आई बाबा वॉर्ड मधून बाहेर येताना दिसले. त्याबरोबर स्नेहाने मला आत जाण्यास खुणावले. मी श्याम जवळ पोचले तेव्हा तो माझीच वाट पाहत असावा. त्याचा हात हातात घेऊन बराच वेळ मुक्याने बसून राहीले. इतक्यात आईचा फोन वाजला."हँलो आई""शर्वरी, अगं टिव्हीवर बातमी आलीय. त्यानी सकाळच्या रेल्वेअपघाताच्या बातमी बद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. तो श्याम नव्हता" हो आई , तो श्याम नव्हता.. माझा श्याम जिवंत आहे.." असे बोलून मी श्यामला घट्ट मिठी मारत श्याममय झाले...