(Image Credit : The Independent)
प्रेमाचं नातं आधी जसं होतं तसंच उत्साही आणि प्रेमाचं रहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण नातं त्यांना हवं तसं ठेवण्यासाठी काय करावं लागतं याचा विचारच करत नाही. पती-पत्नी, गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डमध्ये छोटे छोटे वाद होत असतात. पण कधी कधी परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे तुमचं हे प्रेमाचं नातं तुम्हाला तसंच कायम ठेवायचं असेल तर काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. खालील काही तक्रारी आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यामुळ नात्यात अडचणी वाढू शकतात. वेळ काळ पाहून त्या टाळल्या आणि एकमेकांना समजून घेतलं तर तुमचं प्रेम तसंच कायम ठेवण्यास मदत होईल.
१) तू बदललास
लग्नाच्या किंवा प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात खूपसारं मिळणारं प्रेम काही वर्षांनी कमजोर होऊ लागतं. लग्नानंतर घरातील वाढत्या जबाबदाऱ्या खांद्यावर येऊ लागतात आणि त्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ न देऊ शकणे यामुळे कपल्समध्ये अनेकदा वाद होतात. पण परिस्थिती समजून घेतली तर ही समस्या उद्भवणार नाही.
२) तुझं आता प्रेमच नाहीये
लग्नाच्या काही वर्षांनंतर परिस्थिती बदलते त्यामुळे आधीसारखं प्रेम नसल्याची तक्रार काही लोक करु लागतात. जोडीदार आता आधीसारखं प्रेम करत नाही असा त्यांचा समज होतो. पण एकसारखं प्रेम सतत राहूच शकत नसतं. काही वर्षांनी त्यात बदल होतोच. प्रेम असतंच फक्त ते व्यक्त करण्याच्या पद्धती बदललेल्या असतात.
३) तुझ्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच
प्रत्येक पती-पत्नींमध्ये बघायला मिळणारी ही कॉमन तक्रार आहे. कारण पती-पत्नींच्या एकमेकांकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा असतात. यात महिला पुरुषांपेक्षा अधिक पुढे असतात. अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही पण त्याचं प्रमाण हे ठरवायला हवं.
४) तुला तर माझी नेहमीच अडचण होते
हे नेहमीच पाहिलं जातं की, पती-पत्नींमध्ये लग्नाच्या काही वर्षांनी वाद अधिक वाढत जातात. कारण आता महिलाही घरातील, बाहेरील, ऑफिसची सगळी कामे करतात. प्रत्येक पतीलाही हेच वाटत असतं की, त्याच्या पत्नीला सगळी कामे यावीत किंवा तिलाही सर्व व्यवहार करता यावेत. पण घराचा विषय येतो तेव्हा पतीला पत्नी ही त्यांच्या आईसारखी किंवा आजीसारखी रहावी असं वाटत असतं.
५) तू मला सुखाने जगू का देत नाहीस?
लग्नाच्या काही वर्षांनी ही तक्रार बहुतेक पुरुष करु लागतात. त्यांना वाटत असतं की, पत्नीने त्यांच्या प्रत्येक गोष्टीत लुडबूड करु नये. लग्नाआधी होतं तसं स्वातंत्र्य त्यांना हवं असतं. पण लग्नानंतर परिस्थिती बदललेली असते त्यामुळे या गोष्टीही बदलणे स्वाभाविक आहे. पण पत्नीने त्यांना एखाद्या गोष्टीवरुन टोकलं तर दोघांमध्ये भांडणं होतात. मुळात दोघांचा संसार हा दोघांनी समजून घेऊन चालवायचा असतो. त्यात तिसरं काहीच करु शकत नाही. वाद करण्यापेक्षा दोघांनीही वेळ-काळ पाहून वागलं तर या समस्या निर्माणच होणार नाहीत.