आपल्या देशात अनेक देशी-विदेशी कंपन्या असून त्यामध्ये देशभरातील अनेक लोकं काम करत असतात. प्रत्येक कंपनीची किंवा मालकांची अशी इच्छा असते की, आपल्या कंपनीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती खुश असली पाहिजे. जर कर्मचारी खुश असेल तरच तो मनापासून काम करेल, परिणामी याचा फायदा कंपनीलाच होईल. पण कोणत्याही कंपनीचा कर्मचारी आपल्या कामामुळे खुश आहे, त्याला त्या कंपनीबाबत किंवा आपल्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही, असं कधी पाहिलयतं का? नाही ना.. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याकडे दुःखी होण्याचं कोणतं ना कोणतं कारण असतं. कारण आपण नेहमी ऐकतो की, व्यक्ती तितक्या प्रकृती.... प्रत्येकाच्या अपेक्षा या वेगळ्या असतात आणि ह्युमन सायकलॉजीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत.
तुम्हीही थोडा विचार करा. तुमच्याही मनात ऑफिस किंवा तुमचा बॉस यांबाबत तुमच्या मनात थोडा तरी राग असेल. किंवा ऑफिसमध्ये असलेल्या कामामुळे आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या पगारावर तुम्ही संतुष्ट नसालच. अनेक व्यक्ती आपला कमी पगार किंवा कमी पगारवाढ यांमुळे त्रस्त असतात. पगारच त्यांच्या दुःखचं सर्वात मोठं कारण असल्याचं मानलं जातं. परंतु एका संशोधनानुसार, एकाद्या कर्मचाऱ्याचं सर्वात मोठं दुःख हे त्याचा पगार किंवा पगार वाढ नसते. खरं दुःख तर वेगळचं असतं.
अमेरिकेतील गॅलप पोल कंपनीने एक सर्वे केला आहे. या सर्वेनुसार, आपल्या कामासाठी फक्त तीच लोकं समाधानी असतात, ज्यांच्या हातामध्ये सर्व गोष्टींचा कंट्रोल असतो. म्हणजेच ऑफिसमध्ये काम करताना त्यांना एखादा निर्णय स्वतः घेण्याची मुभा असते. अशा व्यक्ती अगदी मनापासून काम करत असतात. त्याचसोबत ऑफिसच्या कोणत्याही पॉलिसीचा त्यांच्यावर परिणाम होत नसेल तर त्यांना आपल्या कामाबाबत काहीच तक्रारी नसतात.
हे आहे एखाद्या कर्मचाऱ्याच्या दुःखचं खरं कारण
आता जर आनंदाचं कारण फ्रीडम आहे तर दुःखही हेच आहे. एखादी छोटी गोष्ट असो किंवा मोठी. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मॅनेजरची परवानगी घेणं, एखाद्या कामासाठी सतत मॅनेजरला ई-मेल करणं आणि त्यातल्यात्यात एखादा निर्णय घेतलाच तर त्यामध्ये मॅनेजरने येऊन काहीतरी चुका काढणं, प्रत्येक गोष्टीवर मॅनेजरचं गोंधळ करणं. हे आजकालच्या कर्मचाऱ्यांच खरं दुःख आहे. यानंतरचं कारण म्हणजे सुट्टी न देणं.
70 टक्के कर्मचारी मनापासून काम करत नाहीत
संशोधनादरम्यान, 70 टक्के लोकांनी ही गोष्ट मान्य केली आहे की, ते आपल्या मनाने नोकरी करतचं नाहीत कारण, काम करताना त्यांना कोणतंच स्वातंत्र्य मिळत नाही. त्यांना त्यांच्या मनानुसार कोणतचं काम करू दिलं जात नाही. आपल्या आयडिया आणि निर्णय सांगण्याची संधीच देण्यात येत नाही. त्यांचा बॉस प्रत्येक ठिकाणी अडथळा बनून त्यांच्यासमोर उभा राहतो.
दुःखी कर्मचारी करतात अशी चुकीची कामं
संशोधनानुसार, जेव्हा कर्मचारी आपल्या नोकरीमुळे आनंदी नसतात ते सर्वात आधी मनापासून काम करणं सोडून देतात. यानंतर काम न करण्याचे उपाय शोधतात. कामामध्ये अनेक चुका करतात. कामावर त्यांचे मन लागत नाही त्यामुळे ते सतत सुट्ट्या घेतात. ज्यामुळे कंपनीचे अनेक महत्त्वपूर्ण क्लाइंट्सही निघून जातात. परिणामी कंपनीला अनेक नुकसानांचा सामना करावा लागतो.
आता तुम्ही विचार करत असाल की, अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी कंपनी पगारामध्ये योग्य ती वाढ करू शकते. पण संशोधनानुसार, पगारवाढ होणं हा काही वेळापुरताच आनंद आहे. जर पगारवाढ चांगली झाली तर कर्मचारी खूश होऊन काम करतो. परंतु ऑफिसमधील वातावरण आधीप्रमाणेच असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा आनंद काही दिवसांतच दूर होतो. आणि पुन्हा तो कर्मचारी दुःखी होतो.
कर्मचाऱ्यांना असं करा खूश
एवढं सर्व असताना नोकरीबाबत खुश कसं रहायचं? असं काय करायचं की, आपल्या नोकरीसंदर्भात आपुलकी वाटेल? अशा अनेक प्रश्नांनी मनात गोंधळ घातला असेल. कारण कंपनी कशीही असो, पैसे कमावण्यासाठी नोकरी करणं भाग असतं. पण जर आनंदाने नोकरी केली तर मानसिक आरोग्यही चांगलं राखण्यासाठी मदत होते.
संशोधनानुसार, कर्मचारी आनंदाने तेव्हाच काम करतो जेव्हा मॅनेजर त्याची संकल्पना मांडण्याची संधी देतात. काही ठिकाणी त्यांनाही निर्णय घेऊ द्या. एखाद्यावेळी जर सुट्टी मागितली तर त्यांच्याशी वाद न घालता त्यांची सुट्टी मंजूर करा. त्यामुळे मॅनेजरप्रती त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होईल.