गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा नवरा बायको.... भांडणं तर होणारचं. असं म्हणतात की, भांडल्याने प्रेम वाढतं. पण अनेकदा ही भांडणंच नातं तुटण्याचं कारण बनतात. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, एखाद्या नात्यामध्ये भांडण झालं तर त्या भांडणादरम्यान बोललेले अपशब्द नातं तुटण्याचं किंवा नात्यामध्ये दुरावा येण्याचं कारण बनतात. अनेकदा आपल्याला सांगितलं जातं की, नातं हे विश्वासाच्या जोरावर टिकतं. म्हणजेच नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणं आणि खरं बोलणं गरजेचं असतं. पण अनेकदा भांडणांमध्ये एकमेकांच्या कमतरता अपशब्दांमार्फत सांगितल्या जातात. अशा शब्दांचे घाव भरत नाहीत असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे काहीही झालं तरी नातं टिकवण्यासाठी एकमेकांशी आपुलकीने बोलणं गरजेचं असतं. तुमचंही तुमच्या पार्टनरसोबत भांडण झालं असेल तर पुढील 5 गोष्टी करा. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि भांडण संपण्याऐवजी आणखी वाढू शकतं.
1. भांडण विसरून आपल्या पार्टनरसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशातच त्यांची एखादी गोष्ट खटकली तर त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडं शांत राहून पार्टनरची समजूत काढण्याचा प्रयत्न करा. तुमची थोडीशीही चूक भांडण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
2. भांडण झाल्यावर एकमेकांचा राग येणं स्वाभाविक आहे, पण त्यावेळी रागाच्या भरात कोणताही अपशब्द उच्चारू नका.
3. बऱ्याचदा भांडणं एकमेकांना वेळ न देणं आणि जबाबदाऱ्यांची जाणीव नसल्यामुळे होतात. त्यामुळे एकमेकांशी भांडण्याऐवजी तुमच्या कामांचं विभाजन आधीच करून घ्या. त्यामुळे कामही सहज होतील आणि भांडणंही होणार नाही.
4. तुमच्या भांडणामध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला सहभागी करू नका. मग ती व्यक्ती घरातील असो किंवा मित्र-मैत्रिणींपैकी कोणी. दोघांमधील भांडण दोघांमध्येच सोडवण्याचा विचार करा.
5. तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रीया दिल्यामुळे अनेकदा भांडण आणखी वाढतं.