सातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वांनाच मास्क वापरावे लागतात. याचाच फायदा जिल्ह्यातील महिला बचत गटांनी घेतलाय. कारण ११० गटांतील ३३० भगिनींनी आतापर्यंत जवळपास ७८ हजार मास्कची निर्मिती केली. त्यामुळे या गटांना सुमारे साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना हे यश मिळविता आले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहे. शासन आणि प्रशासन सर्वच पातळ्यांवर रात्रंदिवस काम करीत आहे. कोरोना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सध्या प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. हीच गरज ओळखून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटांना मास्क बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
याचाच फायदा या गटांना होताना दिसून आलाय. कोरोना विषाणूमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांचा रोजगारही बुडालाय. पण, महिला बचत गटांनी मास्क तयार करून उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, त्याचा फायदाही होऊ लागलाय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क बनवण्यासाठी गटातील भगिनी रात्रंदिवस राबत आहेत. आतापर्यंत ११० बचत गटांनी सुमारे ७८ हजार मास्क तयार केले आहेत. या गटांतील ३३० महिलांचा यामध्ये सहभाग राहिला आहे. महसूल, आरोग्य विभाग तसेच नगरपालिका, महिला बालकल्याण विभागांना मास्क पुरवण्यात आले आहेत. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्यांपैकी जवळपास ७५ हजार मास्कची विक्री झालीय. या मास्क विक्रीतून गटांतील महिलांना सुमारे साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
यामुळे गटातील भगिनींना कोरोना असतानाही उत्पन्नाचे एक चांगले साधन मिळाले आहे. अजूनही या भगिनी मास्कची निर्मिती करत आहेत. यासाठी या गटांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गट चांगल्या प्रकारचे कापडी मास्क तयार करत आहेत. आवश्यकता आहे तेथे माफक दरात पुरविण्यात येतात. तसेच या मास्कच्या निर्मितीतून बचत गटांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यापुढेही मास्कची निर्मिती होणार असल्याने फायदा होणार आहे.- अविनाश फडतरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा