कधी ना कधी तुमचा सामना अशा लोकांशी होतो जे अनेकवर्ष सिंगलच आहेत, किंवा ते कधी प्रेमाच्या नात्यात कधी अडकलेच नाहीतेय. अशा लोकांकडे सिंगल राहण्याची अनेक कारणेही असतात. पण हे लोक सिंगल का राहतात? ते का प्रेमात पडण्याचा विचार करत नाहीत? चला जाणून घेऊया याची काही कारणे....
1) स्वत:वर प्रेम
काही लोक असे असतात ज्यांना आनंदी राहण्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गरज लागत नाही. असे लोक इतरांवर प्रेम करण्यापेक्षा केवळ स्वत:च्याच प्रेमात अधिक असतात. ते स्वत:च्याच आनंदाची आणि गरजांची काळजी घेतात. त्यामुळे हे लोक सिंगल राहणे पसंत करतात.
2) अॅडजस्टमेंट करायला घाबरतात
काही लोकांना आपलं जीवन हे त्यांच्या हिशोबाने जगायचं असतं. दुसऱ्याने त्यांना येऊन कंट्रोल करणे, अॅडजस्टमेंट करायला लावणे त्यांना पसंत नसतं. नातं प्रेमाचं असो वा लग्नाचं त्यात अनेक ठिकाणी तडजोड करावी लागते. पण काहींना तडजोड नको असते त्यामुळे ते सिंगल राहणं पसंत करतात.
3) भूतकाळातून बाहेर न येणे
काही लोक हे कधीकाळी कुणावर केलेल्या प्रेमातून कधी बाहेरच येत नाहीत. हे सुद्धा सिंगल राहण्याचं एक महत्वाचं कारण आहे. पहिल्या प्रेमात दगा मिळाला असेल आणि त्याचा त्रास अजूनही होत असेल तर नवीन नातं तयार करणं जरा कठीणच असतं.
4) करिअरवर लक्ष केंद्रीत करणारे
काही लोक हे आपल्या करिअरबाबत फारच सिरिअस असतात. त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. त्यांना एखाद्या नात्यात अडकून आपलं लक्ष भरकटवायचं नसतं. त्यामुळे तेही सिंगल राहतात.
5) नात्यासाठी तयार नाही
अनेकदा आजूबाजूच्या लोकांच्या नात्यातील चढउतार पाहून काही लोक घाबरुन जातात. आजूबाजूला जे घडतंय ते बघून काही लोक आपण यासाठी तयार नसल्याचा विचार करतात. कदाचित त्यांना या गोष्टींसाठी वेळ लागणार असतो. पण काही असेही लोक असतात की, ते या गोष्टींता इतका धसका घेतात की, ते नेहमी सिंगलच राहतात.