Relationship : व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर या दोन गोष्टी प्रेमात असलेल्या कपल्ससाठी जणू वरदानच आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेसेज करून कपल एकमेकांच्या मनातील गोष्टी व्यक्त करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, तुम्ही पाठवलेला मेसेज तुमच्या नात्याबाबत खूपकाही सांगतो. मेसेज करण्याची सवय सुद्धा रिलेशनशिपमध्ये समस्या ठरू शकते. याबाबत एक रिसर्च करण्यात आला असून त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.
हा रिसर्च ब्रिंघम यंग युनिव्हर्सिटीमधील अभ्यासकांनी केला आहे. यात २७६ लोकांचा समावेश करून घेण्यात आला होता. यातील 38 टक्के लोकांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला. 46 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या पार्टनरसोबत एंगेज्ड आहेत आणि 16 टक्के लोकांनी सांगितले की, ते विवाहित आहेत.
तसेच 82 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या पार्टनरला दिवसभर अनेकदा मेसेज करतात. त्यांनी सांगितले की, या मेसेजमधून ते प्रेम व्यक्त करतात, त्यात प्रेम असतं. तर जास्तीत जास्त लोकांनी सांगितले की, ते त्यांची समस्या सोडवण्यासाठी पार्टनरला मेसेज करतात. व्हॉट्सअॅपवर जास्तीत जास्त चॅटींग एखादा वाद मिटवण्यासाठी आणि पार्टनरला मनवण्यासाठी करतात.
या रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, टेक्स्ट मेसेजचा वेगवेगळ्या जेंडरवर काय प्रभाव पडतो. जसे की, पुरूष जास्तीत जास्त मेसेज त्यांच्या रिलेशनशिपमध्ये संतुष्टी कमी असल्याने करतात.
त्याचप्रमाणे महिला सुद्धा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सुरू असलेल्या समस्या दूर करण्यासाठी मेसेज करतात. महिला या मेसेजिंगमध्ये आपल्या पार्टनरला माफी मागण्यापासून ते नातं कायम ठेवण्यासाठी विनंती करणारे मेसेजे लिहितात.