मुंबई : जसं प्रेम करणं हा नात्यातील महत्वाचा भाग आहे तसाच एखाद्या गोष्टीचा विरोध करणं हाही प्रत्येक नात्यात भाग महत्वाचा भाग आहे. अनेकदा अशाच एखाद्या गोष्टीमुळे दोघांमध्ये भांडणं होतात. कधी कधी कामाचा ताण पार्टनरवर काढला जातो. छोट्या छोट्या गोष्टींवरुन बाचाबाची होते. रागाच्या भरात एकमेकांना काहीही बोललं जातं. पण जर आपल्या बोलण्यावर किंवा बोलण्याच्या पद्धतीचं भान ठेवलं नाही तर तुमच्या पार्टनरच्या सन्मानाला ठेच लागू शकते. असं झाल्यास हे फारच महागात पडू शकतं. त्यामुळे पार्टनरसोबत भांडण झाल्यास काही गोष्टी बोलणे आवर्जून टाळायला हवे. त्या गोष्टी काय आहे हे खालीलप्रमाणे सांगता येतील.
1) 'तुला कधीही कळणार नाही माझी स्थिती काय आहे'
भांडणं झाल्यावर अशाप्रकारची तक्रार करणे फारच वाईट गोष्ट आहे. एकाएकी असं जजमेंटल होऊन चालत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला म्हणता की, तुम्ही फेस करत असलेली स्थिती त्याला किंवा तिला करणार नाही. याचा अर्थ तुम्ही एकप्रकारे तुमच्या पार्टनरवर बेजबाबदार, निष्काळजी किंवा भावनाहीन असल्याचा आरोप करताय असा होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असता तेव्हा अर्थातच त्या व्यक्तीला तुमची आणि तुमच्या भावनांची काळजी असतेच. त्यामुळे त्यांच्यावर अशाप्रकारे आरोप लावणे किंवा त्यांच्या प्रेमावर संशय घेणे चुकीचे ठरते.
2) 'तुला जे करायचं ते कर, मला देणं-घेणं नाही'
खरंतर रागाच्या भरात तुम्ही हे म्हणत असाल तरी असं तुमच्या मनात नसतं. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीवर या वाक्याचा फार मोठा वाईट प्रभाव पडू शकतो. हे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून बोललं गेल्यास मनाला ठेच लागते. कदाचित तुम्ही याचा विचारही करत नसाल पण फरक पडतो. तुमचा पार्टनर कधीही हे विसरु शकत नाही.
3) 'काय मुर्खपणा आहे' किंवा 'काय हे हास्यास्पद'
अशाप्रकारे तुम्ही जेव्हाही तुमच्या पार्टनरला बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मताचा, विचाराचा अपमान करत असता. हे तुमच्या पार्टनरची इज्जत काढण्यासारखंच आहे. त्यामुळे अशाप्रकारे कधीही बोलू नका. प्रेमाच्या किंवा कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर-सन्मान ठेवणे फार महत्वाचे आहे. या छोट्या छोट्या पण गंभीर वाक्यांमुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं.
4) 'तू नेहमी असंच करतो किंवा करते'
हे बोलणं तसं फार गंभीर वाटत नाही पण याचाही तितकाच वाईट प्रभाव पडू शकतो जितका वरच्या बोलण्याने पडतो. कारण 'नेहमी' जर हे असंच सुरु आहे तर मग याआधी तुम्ही यावर कधी बोलला का नाहीत. आणि हे केवळ तुम्हाला राग आल्यावरच का आठवतं? नॉर्मल असताना का आठवत नाही? ही विचार करण्यासारखी बाब आहे.
5) निरर्थक आणि शिव्या
रागाच्या भरात अनेकांना काहीही वायफळ बोलण्याची सवय असते. ज्या गोष्टीवरुन भांडणं झालं ती सोडून विषय सोडून बोलण्याची सवय असते. काही लोकांना तर रागात शिव्या देण्याचीही सवय असते. हे फार चुकीचे आहे. वाद काय आहे त्यावर शांतपणे बोला. चिडून प्रश्न सुटत नाही.