Relationship : भारतात अरेंज मॅरेजलाच जास्त महत्व आहे. आजही भारतात जास्तीत जास्त लग्ने अरेंजच असतात. जास्तीत जास्त हेच बघण्यात येतं की, जुळवलेली लग्नेच जास्त काळ टिकतात. अरेंज मॅरेजमध्ये दोन अनोळखी लोक एकत्र येतात आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात करतात. पण अरेंज मॅरेजमध्ये काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते.
जर तुमचं अरेंज्ड मॅरेज होणार असेल किंवा नुकतंच झालं असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लगेच आपल्या पार्टनरकडून खालील 5 गोष्टींची अपेक्षा करु नये. अपेक्षांच्या बाबतीत घाई करुन अजिबात चालत नाही. याने तुमचं नातं अडचणीत येण्याची शक्यता आहे.
1) लग्न होऊन नुकतेच काही दिवस झाले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की, पत्नीने तिचे आई-वडील किंवा भाऊ-बहिणींच्या तुलनेत तुमच्याकडे जास्त लक्ष द्यावं, तर ही जरा घाई होईल. ज्या घरात ती इतकी वर्ष राहिली ते घर सोडून ती तुमच्या अनोळखी लोकांच्या घरात आली आहे. तिला तुमच्याप्रति प्रेम वाढायला जरा वेळ लागेल. तिला जरा वेळ द्या कारण तिच्यासाठी सगळंच नवीन असतं.
2) बहुतेक मुलांची अपेक्षा असते की, त्यांच्या पत्नीने लग्नानंतर लगेच आपल्या आई-वडीलांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी. जर मुलगी हाऊसवाईफ असेल तर अपेक्षा अधिकच होते. पण त्यांची सेवा करणे आणि त्यांना मनापासून प्रेम देणे यात फरक आहे. जे प्रेम मुलगी आपल्या आई-वडिलांना देते, तेच प्रेम लग्न झाल्यावर सून तिच्या सासू-सासऱ्यांना दिलं जाऊ शकतं. सासू-सासरे आणि सून यांच्यातील नातं वेळेनुसार आणखी मजबूत होत जातं. पण हे नातं एकतर्फी प्रयत्नातून होत असेल तर कधीही शक्य होत नाही.
3) ज्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न केलंय त्या व्यक्तीला तुम्ही काही दिवसांपूर्वीच भेटले आहात. तिच्यासोबत लग्न केल्यावर दुस-या दिवशीच तिच्याशी तुमचं सगळं पटायला लागेल असं होत नसतं. तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी, चांगल्या-वाईट गोष्टी जाणून घ्यायला वेळ लागेल. यादरम्यान तुमच्यात छोटी छोटी भांडणंही होतीलच. पण ही भांडणं सोडवत तुम्हाला नातं पुढे न्यावं लागेल.
4) साखरपुडा आणि लग्न यामधील वेळ हा दोघांसाठीही महत्वाचा असतो. तुम्हाला एकमेकांना थोडंफार जाणून घेण्यासाठी हा वेळ महत्वाचा ठरतो. पण काही लोक फारच उतावळे झालेले बघायला मिळतात. त्यांना असं वाटतं की, त्यांच्या होणा-या बायकोने सतत त्यांच्याशी गुलूगुलू बोलावं. पण हे शक्य आणि योग्यही नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी एक अंतर ठेवणंही महत्वाचं ठरतं.
5) तुमच्या पार्टनरचं तुमच्या मित्रांसोबत वागणं कसं आहे, हेही अनेकदा अनेकांसाठी महत्वाचं ठरतं. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, तुमच्या पार्टनरने तुमच्या मित्रांसोबत आनंदाने भेटावं. पण तुमच्या पार्टनरला त्यांना भेटणं पसंत नसेल किंवा ती तुमच्याबद्दल एखादी गोष्ट त्यांना सांगत असेल, तर त्यावर चिडण्यापेक्षा शांतपणे विचार करा.