तुमच्या एक्ससोबत प्रेमाचं नातं संपवल्यानंतर पुन्हा केवळ मैत्रीचं नातं ठेवण्याची स्थिती समोर आली की, अनेक प्रश्न मनात येऊ लागतात. ज्या व्यक्तीसोबत केवळ प्रेमाच्या गोष्टी तुम्ही बोलायचे त्या व्यक्तीसोबत सामान्य मित्राप्रमाणे बोलणे शक्य आहे का? काय पुन्हा त्या व्यक्तीसोबत मैत्री होऊ शकते? काय त्या व्यक्तीसोबत पुन्हा नजर मिळवली जाऊ शकेल? असे प्रश्न उभे ठाकतात. पण तरीही असं मैत्रीचं नातं ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. या गोष्टी तुमच नवं नातं योग्य मार्गाने पुढे सरकण्यास मदत होईल.
1) आधी वेळ घ्या
जर तुमच्या एक्स-बॉयफ्रेन्डने किंवा एक्स-गर्लफ्रेन्डने तुमच्याशी पुन्हा बोलण्याचा निर्णय घेतला असेल. प्रेमाच्या नात्याऐवजी केवळ मित्र किंवा मैत्रिण म्हणून हात पुढे करण्यास सांगितलं असेल, तर काहीही उत्तर देण्याआधी थोडा वेळ घ्या. नंतर स्वत:ला वेळ द्या, स्वत:ला प्रश्न करा की, काय खरंच तुम्ही पुन्हा त्या व्यक्तीसोबत बोलू शकणार आहात किंवा नाही. जर पूर्ण विचार केल्यावर हे कठीण असल्याचं वाटल्यास पुढे जाऊ नका.
2) दोघांची सहमती असावी
जर तुम्हाला वाटत असेल की, दोघांचं प्रेमाचं नातं संपवणं एक योग्य निर्णय होता, तर तुमच्या एक्स पार्टनरलाही असेच वाटणे गरजेचे आहे. दोघेही जर ब्रेकअपला योग्य मानत असतील तरच दोघेही मैत्रीच्या नात्याकडे वळू शकतात. पण जर कुणा एकाच्या मनात अजूनही प्रेमाची भावना असेल आणि त्या व्यक्तीला वाटत असेल की, पुन्हा प्रेमाचं नातं निर्माण व्हावं तेव्हा मैत्रिचं नातं तयार होऊ शकत नाही.
3) भेटताना घ्या ही काळजी
प्रेमाचा रस्ता सोडून मैत्रीच्या मार्गावर दोघांचेही पडणारे पाऊल सहमतीने पुढे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. केवळ फोनवरच नाही तर तुम्ही भेटूनही बोलू शकता. पण कुठे भेटायचं आहे, काय बोलायचं आहे, या गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतील. कोणत्याही रोमॅंटिक जागेवर भेटण्याचा विचार करु नका. याने दोघांमध्ये अवघडलेपणा येऊ शकतं.
4) केवळ मित्र माना
जर तुमचं ब्रेकअप झालं असेल जर त्याच्यामागे काहीतरी कारण असेलच. त्यानंतर मैत्रीचं हे स्विकारलेलं नातंही विचार करुनच घेतलं असेल. नंतर पुन्हा प्रेमात पडणं किंवा तशा भावना मनात येणं चुकीचं ठरेल. त्यामुळे दोघांनीही मनाशी हे ठरवलं पाहिडजे की, तुम्ही आता केवळ मित्र आहात.
5) सर्वात महत्वाची बाब
आता जर तुम्ही केवळ मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही आणखीही काही गोष्टी ठरवायला हव्यात. जसे तुम्ही आधी बोलत होतात, एकमेकांना प्रेमाचे संदेश पाठवत होतात, असे काहीही आता करता येणार नाही. कुणाकडूनही असे होत असेल तर ती मैत्री टिकणारच नाही. आणि अशा मैत्रीला काही अर्थही उरणार नाही.
6) एकमेकांना लाइफ पुढे नेण्यास मदत करा
जर तुमच्या ब्रेकअपनंतर तुमच्या दोघांच्याही आयुष्यात दुसरं कुणी आलं नसेल तर दोघांनीही एकमेकांना लाइफमध्ये पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. जर दोघांपैकी एकाच्या आयुष्यात कुणी आलं असेल तर त्याबाबत आनंद व्यक्त केला पाहिजे. नाराज होऊन कोणत्याही प्रकारचे चुकीचे संकेत देऊ नये. कारण तुम्ही आता केवळ मित्र आहात.