- ॲड. सुनीता कापरेकर, कुटुंब कायद्याच्या अभ्यासक
काही दिवसांपूर्वी जवळपास ३०-३२ वर्षे संसार केलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला. घेण्या-देण्याची काही अट नाही. फक्त घटस्फोट हवा होता आणि एकमेकांपासून विभक्त होऊन स्वतंत्र आयुष्य जगायचे होते. खरं तर वयाच्या साठी-पासष्टीनंतर व्यक्तीला साथीदाराची अधिक गरज असते. २०-२५ वर्षे संसाराचा गाडा सुखानं हाकलल्यानंतर त्याचा मुरंबा झालेला असतो आणि त्याचवेळी काही जोडप्यांना संसाराच्या गाडीची चाके वेगवेगळी करायची असतात. याला वैवाहिक कलह, एका साथीदाराने केलेली प्रतारणा, अशी असंख्य कारणे आहेत. पण आणखी एक कारण पुढे येत आहे, ते म्हणजे संसार करून तृप्त झालेल्या मनाला विरक्तीची आस लागलेली असते. बंधने नको असतात, आयुष्यात तोच तो पणा नको असतो... तारुण्यात अर्धवट राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. छंद जोपासायचे असतात म्हणूनही ‘सिल्व्हर ज्युबिली सेपरेशन’ आपल्याला पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत तरुणांबरोबरच वयाच्या पन्नाशी-साठीनंतर घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांची संख्याही वाढली आहे. तरुणांनी घटस्फोट घेणे एकवेळ आपण मान्य करतो, पण पन्नाशीनंतर घटस्फोट घेणे आपल्या पचनी पडत नाही. आपल्याकडे ‘सिल्व्हर ज्युबली सेपरेशन’ ही संकल्पना रुजलेली नाही. पाश्चात्य देशात हे सर्रास चालते; पण आपल्याकडेही हे लोण पसरेल की काय?, अशी शंका येते.
काही महिलांनी सुखाच्या संसाराचा आनंद लुटलेला असतो. वयाच्या एका टप्प्यानंतर काही स्त्रियांना पतीच्या सहवास नको असतो. त्यांना संसारातून विरक्ती हवी असते आणि त्या नव्या जीवनाच्या शोधात असतात. संसारिक कर्तव्यातून मोकळ्या झालेल्या स्त्रिया स्वत:च्या स्वातंत्र्यासाठीही घटस्फोट घेत आहेत. पण असे कारण देऊन घटस्फोट मागणाऱ्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत.
चारचौघांत अपमान करणारा नवरा नको
स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याने त्यांनाही स्वच्छंदी आयुष्य जगायचे असते. पूर्वीसारख्या स्त्रिया पैशांसाठी पुरुषांवर अवलंबून नाहीत. वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर त्यांच्याकडे स्थैर्य आलेले असते. त्यामुळे नको असलेल्या नात्याचे ओझे त्या सहजपणे नाकारतात. व्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व पटल्याने ‘लाथ मारेल’ तोच पुरुष असे न मानता ‘बावळट’ म्हणून चारचौघांत अपमान करणारा नवराही सहन होत नाही.
साठीतील घटस्फोटाची काय आहेत कारणे?
साठीत घटस्फोट घेतलेली चार-पाच जोडपी समोर आली. साधारणत: सर्वांचा ३० वर्षे संसार झाला होता. इतकी वर्षे सोबत राहून यांची मने जुळली नाही का? असा प्रश्न पडला. परंतु, काही कारणे पुढे आली. मुख्य म्हणजे ‘एम्प्टीनेस्ट सिंड्रोम’ रिकामेपण... मुले परदेशात किंवा अन्य ठिकाणी स्थायिक झाली की, भरलेले घरटे रिकामे होते आणि रिकामेपण येते. ते असह्य झाल्याने काहींचे मानसिक स्वास्थ बिघडते आणि त्यातूनही घटस्फोट मागितला जातो. काहीजणांचे विवाह्यबाह्य संबंध असतात, तर काहींच्या घरात वैवाहिक वाद असतात. पण मुलाबाळांकडे बघून संसार रेटला जातो. सासू-सासरे, आई-वडिलांच्या दबावाखाली, हे जोखड घेऊन २५-३० वर्षे कशीबशी काढली जातात. मुले मोठी झाली की, आई-वडिलांची नात्यातील घुसमट पाहून तेच त्यांना विभक्त होण्याचा सल्ला देतात.