नुकतंच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या बहुचर्चीत जोडप्याचा शाही विवाह पार पडला. पण अजूनही त्यांच्या चाहत्यांना एका प्रश्नाने छळलं आहे. तो म्हणजे केवळ सहा महिने डेटिंग करुन या दोघांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? यावर निक जोनासला विचारलं गेलं तर त्याने सांगितलं की, 'आमच्या दोघांच्याही आई-वडिलांनी लवकर लग्न केलं होतं. जेव्हा तुम्हाला कळतं की ही योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती आहे. तेव्हा तुम्हाला आपोआप जाणवतं'.
लग्न करण्याचा निर्णय घेणं ही कुणासाठीही वेळखाऊ आणि गंभीर प्रोसेस आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातूनही हे समोर आलं आहे. यातून समोर आलं आहे की, एखादी व्यक्ती लग्नासाठी योग्य आहे अथवा नाही, याचा निर्णय घेण्यासाठी लोक साधारण सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतात.
हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील २ हजार रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि नसलेल्या लोकांना काही प्रश्न विचारले. त्यांना विचारण्यात आलं होतं की, ते किती दिवस आणि किती डेटनंतर हे ठरवतात किंवा ठरवतील की त्यांना समोरची व्यक्ती आवडते आणि हे नातं पुढे जाऊ शकतं.
यातून अभ्यासकांना हे आढळलं की, रिलेशनशिपमध्ये असणारे लोक हे सरासरी १७२ दिवस हे ठरवण्यासाठी वेळ घेतात की, त्यांना पार्टनरसोबत लग्न करायचं आहे की नाही. तर सिंगल असणारे लोक हाच निर्णय घेण्यासाठी साधारण २१० दिवस वेळ घेतात.
तज्ज्ञ याबाबत त्यांचं मत सांगतात की, हनीमूनचा मडू हा साधारण ३ महिने कायम असतो आणि त्यानंतर लोक आपलं खरं रुप दाखवायला लागतात. यानंतरच दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी माहीत व्हायला लागतात. तज्ज्ञांनी हेही सांगितलं की, असा काही आयुष्य बदलवणारा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या आतून येणाऱ्या भावना ओळखता यायला हव्यात.
या अभ्यासात सहभागी काही लोकांनी सांगितले की, पाच वाईट इंटरॅक्शननंतर ते कुणी आवडलं की नाही याचा निर्णय घेतात. पण रिसर्च सांगतो की, यासाठी पाच नाही तर केवळ ३ वाईट इंटरॅक्शनच फार आहेत.