(Image Credit : www.commonsensemedia.org)
आई-वडिलांसाठी आपल्या मुला-मुलींपेक्षा मोठी गोष्ट या जगात दुसरी कोणती नसते. त्यांची इच्छा, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच ते दिवसरात्र मेहनत करत असतात. प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते की, त्यांच्या मुला-मुलींना सर्व सुख-सुविधा मिळाव्यात. पण केवळ भौतिक सुविधा देऊनच पालक आपली जबाबदारी झटकू शकत नाही.
लहान वयात मुला-मुलींना सर्वात जास्त गरज असते ती आई-वडिलांचा वेळ मिळणे. आजकाल आई-वडील दोघेही नोकरी करतात, त्यामुळे त्यांच्याकडे मुलांसाठी वेळ नसतो. अनेकदा पालक हे स्वत:ची तुलना आपल्या पाल्यांसोबत करताना दिसतात. पण याचा फार वाईट प्रभाव त्यांच्यावर पडताना दिसतो. त्यामुळे काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) आजकालच्या लहान मुला-मुलींमध्ये फार राग आहे. त्यामुळे त्यांची स्वत:शी तुलना करु नका. अशात त्यांची चुकी असेल तरी त्यांना प्रेमाने समजावून सांगा. मुलांच्या हट्टीपणावर अनेकदा त्यांना रागावलं जातं, त्यांना मारलं जातं. पण लक्षात ठेवा याचा त्यांच्यावर उलटा प्रभाव पडतो.
२) अनेकदा लोकांना वाटत असतं की, आपल्या मुला-मुलींवर प्रेम करणं याचा अर्थ म्हणजे त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणं. पण जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करत असाल तर हा मोठा मूर्खपणाच ठरेल. तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलीवर इतकंच प्रेम आहे तर त्यांना तेच द्या जे योग्य आहे आणि ज्याची गरज आहे.
३) मुलांना वाढवताना शिस्त हाही एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मुलांना शिस्त लावणे म्हणजे त्यांना घाबरवणं नाही. तुम्हाला शिस्त आणि भीती यातील फरक माहीत असायला हवा. अनेक आई-वडील मुलांना शिस्त लावण्यासाठी मारझोड करतात. पण हे योग्य नाही. याचा त्यांच्यावर वाईट प्रभाव पडतो.
४) मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या रुटीनमध्ये जरा बदल केला तर चांगलं होईल. कमीत कमी दिवसातील एका जेवणावेळी तुम्ही सोबत असायला हवे किंवा निदान ब्रेकफास्टला तरी सोबत असायला हवे. त्यासोबतच त्यांच्यासोबत दिवसभर काय केलं, अभ्यास काय केला याबाबत बोला.
५) नोकरी आणि धावपळीचं जीवन यामुळे पालकांकडे आपल्या पाल्यासाठी वेळ नाही. पण लहान मुलांसोबत वेळ घालवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबत प्रत्येक आनंद शेअर केला पाहिजे. मुला-मुलींना काय वाटतं, त्यांच्या मनात काय सुरु असतं, त्यांना काय आवडतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने मुलांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल.