जगभरातल्या लोकांना सोशल मीडियानं वेड लावलं आहे. एकवेळ माणसं एखाद्या दिवशी घराच्या बाहेर पडण्याचा कंटाळा करतील; पण, सोशल मीडियावर चक्कर टाकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. असं असतं काय सोशल मीडियावर, असा प्रश्न विचारणं आता जुनाट वाटेल; उलट काय नसतं त्या सोशल मीडियावर? खाण्यापासून जगण्यापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या सोशल मीडियाच्या जगात सापडतात. अर्थात काल ट्रेण्डिंग असलेल्या गोष्टीवर उद्या कदाचित कोणी एक शब्दही काढणार नाही; पण, सोशल मीडियावर आज काय ट्रेण्डिंग आहे, याची उत्सुकता सामान्य माणसापासून व्यावसायिकांपर्यंत अन् कट्ट्यावर बसून गप्पा मारणाऱ्यांपासून ते माध्यमांवर गंभीर चर्चा करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते.
सध्या सोशल मीडियावर दोन थिअरीज ट्रेण्डिंगमध्ये असून, जगभर त्यावर चर्चा होत आहेत. एक थिअरी म्हणते, आयुष्यातल्या संधी या रस्त्यावरच्या ‘लाल गाड्यां’प्रमाणे असतात. तर आपल्या जवळच्या माणसांचं आपल्यावर खरंच प्रेम आहे का? या अवघड प्रश्नाचं उत्तर संत्री सोलण्याच्या सोप्या कामातून सहज मिळू शकतं, असं दुसरी थिअरी सांगते. या दोन थिअरी ‘रेड कार’ थिअरी आणि ‘ऑरेंज पील’ थिअरी म्हणून ओळखल्या जातात. एलेना ॲशर ही ‘लॅशमेकर्स’ या जगातल्या प्रसिद्ध ब्यूटी प्रोडक्टसच्या ब्रॅण्डची संस्थापक आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरील पेजवरून तिनं आयुष्यातल्या उचित संधीकडे बघण्याची दृष्टी देण्यासाठी रेड कार थिअरीचं उदाहरण दिलं आहे.
रेड कार थिअरी म्हणते, जगभरातली बहुतांश माणसं “संधीच नाही हो; नाहीतर, खूप काही करता आलं असतं!” अशी तक्रार करत असतात. पण, जेव्हा लोक असं म्हणतात, तेव्हा ते खोटं बोलत असतात. त्यांचं खोटं बोलणं म्हणजे रस्त्यावर एकही रेड कार न दिसण्यासारखं असतं. रस्त्यावर लाल गाडी दिसणार नाही असं कधी होईल का? रस्त्यावर लाल गाड्या खूप असतात; पण, आपण दिवसभरात किती लाल गाड्या बघितल्या, असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपल्याला उत्तरच देता येत नाही. कारण, आपलं त्याकडे लक्षच नसतं. त्यामुळे आयुष्यात संधी खूप असतात; पण, आपले त्याकडे लक्ष नसल्याने त्या निसटून जातात.
कुठलीही गोष्ट संधीमध्ये रूपांतरित करता येते; पण, त्याकडे बघण्यासाठी आपल्याकडे तशी नजर हवी. आपल्यासमोरच्या संधी आणि रस्त्यावरच्या लाल गाड्या यात साम्य म्हणजे या दोन्ही गोष्टी भरपूर असतात आणि सर्वत्र असतात. पण, त्या लक्ष देऊन नाही बघितल्या तर आपल्या जाणिवेतून निसटून जातात. त्यामुळेच मग संधीचं सोनं करता येत नाही. ते करायचं असेल तर रस्त्यावरच्या लाल गाड्या पाहायला शिका. हे शिकणं म्हणजे सजगतेनं आपल्या आयुष्याकडे बघणं होय.
समजा तुम्हाला कोणी सहज विचारलं की आज रस्त्यावर किती लाल गाड्या बघितल्या तर आपल्याला ते सांगता येणार नाही. पण, तेच कोणी रस्त्यावर बघितलेल्या प्रत्येक लाल गाडीसाठी १०० रुपये मिळणार, असं सांगितलं तर मात्र आपण लक्ष देऊन रस्त्यावर धावणाऱ्या लाल गाड्या बघू आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल की, अरेच्च्या या लाल गाड्या छोट्या गल्लीबोळांत आहेत, खडबडीत रस्त्यांवरून धावत आहेत, लोण्यासारख्या रस्त्यावरूनही सर्रकन पुढे जात आहेत. जाणीवपूर्वक पाहिलं, तरच रस्त्यावर लाल गाड्या सर्वत्र आणि खूप आहेत हे कळतं.
आयुष्यात शिकण्याच्या, काही करून दाखवण्याच्या, कमावण्याच्या संधी रेड कार्सप्रमाणे पावलोपावली आणि खूप आहेत. फक्त त्याकडे बघायला शिका, प्रत्येक संधी टिपायला शिका! ही ‘रेड कार थिअरी’ लोकांना इतकी आवडली की जगभरातल्या लोकांनी ती आपल्या अनुभवाला ताडून बघितली आणि ही रेड कार थिअरी खरंच तर सांगते आहे, अशी लोकांना खात्री पटली.
‘ऑरेंज पील थिअरी’ काय सांगते? नवरा-बायको, आई-मुलगी किंवा वडील-मुलगा, मित्र-मैत्रीण असं कोणतंही नातं असू दे, ते नातं किती निकोप आहे, हे तपासण्याची एक छोटीशी परीक्षा म्हणजे ‘मला संत्री सोलून दे’ असं सांगणं. संत्री सोलणं म्हणजे फारच क्षुल्लक काम; पण कोणतीही का कू न करता समोरच्या व्यक्तीने आपल्याला आनंद वाटावा म्हणून संत्री सोलून दिली तर त्यांच्यासोबतचं आपलं नातं ‘हेल्दी’ आणि आनंदी आहे, असं समजावं आणि संत्री सोलून देण्याऐवजी जर समोरच्याने ‘हे क्षुल्लक काम तुझं तू कर’ असं सांगून चार गोष्टीच सुनावल्या तर त्या व्यक्तीसोबतच्या नात्यावर काम करण्याची गरज आहे हे समजावं.