(Image Credit : Children)
'माझं मूल फार मस्तीखोर आहे...अजिबात ऐकत नाही... आणि नुसते हट्ट' अशा अनेक तक्रारी पालक आपल्या मुलांबाबतत नेहमीच करत असतात. एवढचं नाही तर अनेकदा मुलांच्या हट्टामुळे आणि मस्तीमुळे त्यांना अगदी नकोसं होतं. त्यामुळे ते त्यांना कुठे बाहेर घेऊन जाणं आणि खासकरून पाहुण्यांकडे जाणं टाळतात. कधी-कधी मुलांचा हट्ट एवढा वाढतो की, त्यांवर आळा घालण्यासाठी पालक त्यांच्यावर हातही उगारतात. परंतु, असं करणं योग्य नाही, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. असं करण्याचा मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मुलांना समजावून सांगून त्यांची मस्ती कमी करू शकता.
खरचं मुलं हट्टी आणि मस्तीखोर आहेत का?
अनेक संशोधनामधून असं सिद्ध झालं आहे की, जास्तीत जास्त मुलं आपल्या पालकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी असं करत असतात. जर दोन्ही पालक वर्किंग असतील आणि आपल्या मुलावर जास्त लक्ष देत नसतील तर त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं असं करतात. अशावेळी मुलांचं असं वागण्यामुळे पालकांना राग अनावर होऊ शकतो. पण रागवण्याऐवजी मुल नेमकं असं का करत आहे?, याचं कारण समजून घेणं फायदेशीर ठरतं.
रिअॅक्ट करू नका...
जर मुल लक्ष वेधून घेण्यासाठी असं करत असल्याचं तुमच्या लक्षात आलं, तर त्याला थोडा वेळ द्या. लक्ष ठेवा की, मुलं स्वतःला किंवा इतर गोष्टींना नुकसान तर पोहोचवत नाही ना? याउलट जर त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यांच्याकडे दुर्लक्षं करू नका. त्यांचं कौतुक करा. त्यामुळे मुल हट्ट आणि मस्ती करण्याऐवजी चांगल्या गोष्टी करण्यावर जास्तीत जास्त भर देईल.
त्यांच्यावर हात उगारू नका...
मुलांवर हात उगारणं हा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. मुल मस्ती करत असेल तर त्याला समजावून सांगा. जर तुम्ही त्यांना मारहाण केली तर कदाचित ते त्यावेळी मस्ती करणं बंद करतील पण त्या गोष्टीचा त्यांच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
प्रेमाने समजावून सांगा...
मुलांना शांतपणे आणि प्रेमाने समजावून सांगा की, तो जी मस्ती करत आहे, किंवा ज्या पद्धतीने वागत आहे. ते का चुकीचं आहे. कदाचित एकदा सांगून मुलांना त्या गोष्टी समजणार नाहीत पण तुम्हीही त्या गोष्टी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा.
मुलांना बीझी ठेवा...
मुलांना कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये बीझी ठेवा. मुलं नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी फार उत्सुक असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांना खेळायला देखील फार आवडतं. त्यांच्या या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या आवडीनुसार, त्यांना एखाद्या अॅक्टिव्हिटी क्लासमध्ये पाठवा. यामुळे त्यांची ऊर्जा चांगल्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. तसेच त्यांना काहीतरी नवीन शिकायला देखील मिळू शकतं.
टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.