सध्या भारतामध्ये लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेन्ड आहे. यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. पण झारखंडच्या गुमला जिल्ह्यामध्ये लोक नाइलाजास्तव लिव्ह इनमध्ये राहतात. ऐकून थोडासा गोंधळ उडाला असेल ना? नाइलाजाने कोण लिव्ह इनमध्ये राहत असेल? यामागे कारणही तसंच आहे. या जोडप्यांकडे लग्नामध्ये जेवण देण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे ही जोडपी लग्न न करता लिव्ह इनमध्येच राहण्याचा मार्ग स्वीकारतात. गुमला जिल्ह्यातील चरकटनगर गावामध्ये राजू महली आणि मनकी देवी गेल्या 20 वर्षांपासून एकत्र राहत होते. परंतु आपल्या मर्जीने नाही. गरिबीमुळे ते लग्नाचं जेवणं देऊ शकत नव्हते जे त्यांच्या समाजात लग्नाला मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असते. सोमवारी अशा अनेक जोडप्यांच्या नात्याला समाजात मान्यता मिळावी म्हणून एका एनजीओने एका सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये राजू आणि मनकीप्रमाणे 132 जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले. लग्न परंपरेप्रमाणे त्यांचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचे असे झाले की, झारखंडमधील ओरांव, मुंडा आणि आदिवासी जमातीमध्ये लिव्ह इनमध्ये राहणं एक सामान्य बाब आहे. कारण या समुदायातील लोकांची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची असते. तसेच लग्न समारंभ आणि त्यामध्ये देण्यात येणाऱ्या जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात.
समाजाची परवानगी असणं अत्यंत आवश्यक
स्थानिक बोलीभाषेत त्यांना धकुआ म्हटलं जातं. या प्रथेमध्ये महिलेला आपल्या पार्टनरसोबत एकत्र राहण्यासाठी समाजाकडून परवानगी घेणं आवश्यक असतं. परंतु त्या नात्यामध्ये त्या महिलेला पत्नी न संबोधता धकुआ असं म्हटलं जातं. ज्याचा अर्थ म्हणजे, लग्न न करता एखाद्या पुरुषाच्या घरात राहणं. सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याऱ्या एनजीओने उचललेलं हे पाऊल ही प्रथा दूर करण्यासाठी असल्याचे सांगितले. राजू महली यांनी सांगितले की, 'मी जमिनीच्या एका छोट्या भागात शेती करून माझे पोट भरतो. परंतु माझ्याकडे लग्न करण्याएवढे पैसे नाहीत. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. जेव्हा एनजीओने आम्हाला सामूहिक विवाह सोहळ्याच्या कल्पनेबाबत सांगितले तेव्हा आम्ही लगेच तयारी दर्शवली.
लग्नामध्ये प्रत्येक जोडप्याला 10 पाहुण्यांना घेऊन येण्याची परवानगी
निमित्त एनजीओच्या सचिवांनी सांगितले की, धकुआ महिला पत्नीप्रमाणेच कुटुंबाचा हिस्सा असतात. परंतु त्यांना आणि त्यांच्या मुलांना कोणतेही अधिकार नसतात. आम्ही 2016मध्ये अशा 21 आणि 2017मध्ये 43 जोडप्यांचं लग्न लावून दिल होतं. यावर्षी या संख्येत वाढ झाली असून 132 जोडप्यांची लग्न लावून दिली आहेत.