Valentine's Week 2025 Gift Ideas: अलीकडच्या काही वर्षात व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2025) साजरा करण्याचा प्रघात सुरु झाला आहे. एवढेच नाही तर प्रेमी युगुल या दिवसाची वाट पाहतात आणि तो उत्साहाने साजरा करतात. पार्टी, पिकनिक आणि भेटवस्तू हे त्या दिवसाचे वैशिष्ट्य असते. येत्या ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week 2025) सुरु होत आहे, त्यानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियकर/ प्रेयसीला कोणती भेट द्यावी याचा विचार करत असाल तर त्याआधी पुढे दिलेल्या गोष्टी नक्की वाचा.
व्हॅलेंटाइन वीकमध्ये एकमेकांना भेटवस्तू देण्याचाही ट्रेंड आहे. मात्र अशा काही भेटवस्तू आहेत, ज्या दिल्यामुळे नात्यात दुरावा येण्याची किंबहुना नाते संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
जोडीदाराला 'या' वस्तू देणे टाळा :
बऱ्याच वेळा आपण कटलरीच्या वस्तू किंवा धारदार वस्तू जोडीदाराला भेट म्हणून देतो, ज्या देणे अजिबात योग्य मानले जात नाही. असे म्हणतात की घरातल्या घरात कोणी कात्री, सूरी, विळी मागितली तरी ती हातात देऊ नये तर ती खाली किंवा बाजूला ठेवावी पण हातात देऊ नये. त्यामुळे नात्यात दरी निर्माण होते असे म्हणतात. त्यामुळे या वस्तू भेट म्हणून देणे तर चूकच! यासोबतच तुम्ही तुमच्या जोडीदाराला रुमाल, पेन किंवा घड्याळ वगैरे कधीही गिफ्ट करू नका, या वस्तू गतिमान जीवनाशी संबंधित आहेत, नात्यात विसावा हवा असेल तर या गोष्टी देणे टाळा.
अडचणी वाढू शकतात :
आपल्या व्हॅलेंटाईनसाठी कपडे गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर काळ्या रंगाचे कपडे विकत घेऊन देऊ नका. हा रंग नकारात्मकता दर्शवतो आणि नात्यात फूट पाडण्यास कारणीभूत ठरू शकतो. तसेच शूज, सॅन्डल याही गोष्टी भेटवस्तू म्हणून देऊ नका.
निवडुंग भेट म्हणून देणार असाल तर काटे टोचणारच :
निवडुंग काटेरी असले तरी त्याचे इतके सुंदर प्रकार आहेत, की पाहून त्याबद्दल आकर्षण वाटते. घरात शोभेसाठी एखादे रोप घेणे वेगळे आणि भेट म्हणून निवडुंग देणे वेगळे. ज्याप्रमाणे धारदार वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नये त्याचप्रमाणे काटेरी वस्तूही भेट म्हणून देऊ नये. अन्यथा नातेसंबंधांना काटेरी मार्गावरून खडतर प्रवास करत जावे लागू शकते.
मग द्यावे तरी काय?
व्हॅलेंटाईन वीकनिमित्त (व्हॅलेंटाईन डे 2025) तुमच्या जोडीदाराला फोटो फ्रेम किंवा मातीची मूर्ती भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकेल. यासोबतच तुम्ही तुमच्या जोडीदाराला निसर्ग चित्राची फ्रेम, राधाकृष्णांची मूर्ती वा छायाचित्र भेट म्हणून देऊ शकता. साडी, बांगड्या, नेकलेस, पुस्तक भेट देणे केव्हाही चांगले. यासोबतच जोडीदाराला वेळ देणे ही सर्वात महागडी भेटवस्तू ठरू शकेल, तो देण्याचा विचार नक्की करा.