(Image Credit : postermywall.com)
अखेर ज्या दिवसाची तरूण मंडळी आतुरतेने वाट बघतात तो व्हॅलेंटाइन डे उजाडला. आज म्हणजेच १४ फेब्रुवारीला कपल्स मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेम दिवस साजरा करतात. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. कारण त्याला तसं ऐतिहासिक महत्व देखील आहे. आजही अनेक कपल्स हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात, पण हा दिवस साजरा करण्याची प्रथा कधी, कशी सुरू झाली हे अनेकांना माहीत नसतं.
मुळात जर तुम्ही व्हॅलेंटाइन डे साजरा करता तर तुम्हाला त्याबाबत माहिती असली पाहिजे. म्हणजे कधीपासून हा दिवस साजरा केला जातो? कशी ही प्रथा सुरू झाली? का याची गरज निर्माण झाली? इत्यादी इत्यादी. तर आज आम्ही तुम्हाला या व्हॅलेंटाइन डेबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत.
प्रेमाला विरोध करणारा राजा
रोममध्ये तीसऱ्या शतकातील क्लॉडियस या क्रूर राजाने प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अनेक बंधनं लादली, त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. क्लॉडियस राजाचं असं मत होतं की, अविवाहित पुरूष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या या आदेशाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची लग्न लावून दिली होती.
संत व्हॅलेंटाइन
संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते. त्यांनी प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला. पण राजाच्या आदेशाला धुडकावल्यामुळे राजाने त्यांना २६९ सालातील १४ फेब्रुवारीच्याच दिवशी फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासून आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली. संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो.
व्हॅलेंटाइन डे ची सुरूवात
(Image Credit : nytimes.com)
हा दिवस साजरा करण्याची प्रथा एका रोमन उत्सवापासून झाली. त्या काळात एक ‘Lupercalia’ नावाचा एक उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवात तरूण एका बॉक्समधून तरूणीच्या नावाची चिठ्ठी काढत होते. उत्सवादरम्यान दोघेही कपल बनत होते आणि काही कपल्स लग्नही करत होते. नंतर येथील चर्चमध्ये हा उत्सव ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत साजरा होऊ लागला. त्यानंतर लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाइन यांचं नाव वापरू लागले.
सोशल मीडियातही प्रेमाचा पाऊस
(Image Credit : frenchtoday.com)
गेल्या अनेक वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया आणि संपर्क करण्याच्या माध्यमांमध्ये वाढ झाल्याने या दिवसाच्या लोकप्रियतेतही वाढ झाली असून जगभरात हा दिवस साजरा करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. प्रेमीयुगल, प्रेम व्यक्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती यादिवशी फूल, चॉकलेट आणि गिफ्ट्स देऊन आपलं प्रेम मात्र व्यक्त करतातच.