(Image cradit : CBC.ca)
रविवारची सकाळ होती. कामाला सुट्टी असल्यामुळे निवांत मोबाईल सर्फिग सुरू होतं. तेवढ्यात एका अॅपवर 'दमलेल्या बाबाची ही कहानी तुला' हे गाणं दिसलं. ते गाणं ऐकतानाच चटकन डोक्यात विचार आला की, खरचं सध्याच्या पालकांना आपल्या कामाचा ताण आणि धावपळ यांमुळे आपल्या मुलांना वेळ देण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. पालक आपल्या कामाच्या व्यापामध्ये एवढे बिझी असतात की, त्यांना मुलांसोबत वेळा घालवताच येत नाही. पालक मुलांचे सगळे हट्ट पुरवतात. पण आई-वडिलांचं प्रेम आणि सहवास यांपासून त्यांना लांबच राहावे लागते. खरं तर मुलांना इतर गोष्टींपेक्षा आई-वडिलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या सहवासाची गरज असते. पालकांनी त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे मुलांना जाणून घेणं सहज शक्य होतं. तसेच मुलं एकटी पडत नाहीत. तुम्हालाही तुमच्या मुलांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करायची इच्छा असेल पण तुम्हाला समजत नसेल की, यासाठी नक्की वेळ कसा काढावा? तर आम्ही तुम्हाला काही सहज सोपे उपाय सांगणार आहोत. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला मुलांना वेळ देण्यासाठी मदत होईल.
मोबाईलपासून दूर रहा
तुम्हाला ऑफिसला सुट्टी असेल आणि तुम्ही घरी असाल तेव्हा मोबाईल किंवा लॅपटॉवर वेळा वाया घालवण्याऐवजी तो रिकामा वेळ मुलांसाठी राखून ठेवा. यामुळे मुलं तुमच्या सहवासात राहू शकतील. जसं त्यांनी दिवसभरामध्ये शाळेत काय केलं?, घरी एकटे असतात तेव्हा ते काय करतात? याबाबत जाणून घेण्यास मदत होईल.
शॉपिंगसाठी जाऊ नका
तुम्ही घरी असाल तर शॉपिंगसाठी जाऊ नका. अगदीच महत्त्वाचं असेल तरच जा अन्यथा तो वेळ मुलांसोबत घालवा. घरातून बाहेर जाऊन शॉपिंग करण्याऐवजी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. आवश्यक सामानाची आवश्यकता असेल तर अनेक दुकानदारांकडेही फ्री-होम डिलिवरीची सुविधा उपलब्ध असते.
घरी काम करू नका
घराची साफ-सफाई किंवा इतर कामांमध्ये उगाचच अधिक वेळ वाया घालवू नका. मुलांच्या परिक्षा सुरू असतील त्यावेळी त्यांना वेळ द्या. त्यांची काळजी घ्या. त्यांना अभ्यासात काही मदत पाहिजे असेल तर त्यांना पूर्ण मदत करा.
सोशल साइट्सला बाय म्हणा
हल्ली अनेक लोक फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप इत्यादी सोशल मीडिया साइट्सवर दिवसबर अॅक्टिव्ह असतात. जर तुम्हालाही हा आजार आहे, तर यावर तत्काळ उपचार करा. म्हणजेच, सोशल मीडियावर जास्त वेळा घालवण्याऐवजी तो वेळ मुलांसोबत घालवा. त्यांच्यासोबत खेळा, त्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा. यामुळे तुमच्यातील आणि मुलांमधील नातं आणखी घट्ट होण्यास मदत होईल.
व्यायम करा
जर तुम्ही आपल्या आरोग्यासाठी वेळ काढत असाल तर त्यामध्ये मुलांनाही सहभागी करा. यामुळे तुमच्यासोबतच मुलांचेही आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होईल. तसेच तुम्हाला मुलांसोबत वेळही घालवणं शक्य होईल.
तुमच्या आवडी मुलांसोबत शेअर करा
हल्ली मुलं आणि पालक यांच्या आवडीनिवडी फार मिळत्या जुळत्या असतात. असं अनेकदा पाहायला मिळतं की, आईदेखील मुलीसोबत म्युझिक, डान्स, कुकिंग यांसारख्या गोष्टी शिकत आहे. तर वडिलही मुलासोबत स्विमिंग, ट्रेकिंग, गिटार, तबला इत्यादी गोष्टी एकत्र शिकत आहेत. यामुळे मुलांनाही अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळते आणि पालकांसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळते. तुम्हीही तुमच्या मुलांना अशा काही गोष्टी शिकवू शकता.
मुलांसोबत पालक म्हणून नाही तर त्यांचा मित्र म्हणून बोला
कधी-कधी आपल्या मॅच्युरिटीला बाजूला ठेवून मुलांसोबत त्यांच्याप्रमाणे वागा. त्यांच्यासोबत खेळा. त्यांच्यासोबत चित्र काढा, खेळण्यांसोबत खेळा, सायकल चालवा, व्हिडीओ गेम खेळा. त्यामुळे मुलं खूश होतीलच पण त्यांना पालक नाही तर एक नवीन मित्र मिळाल्यासारखं वाटेल.