लग्न होतं. लग्नानंतर बायकोनं नाव बदलायचं ही पिढय़ांपिढय़ाची रीत आहे. जगभर आहे. पण आजकाल अनेकजणी लग्नानंतर आडनाव बदलत नाही. किंवा माहेर-सासर दोन्ही आडनावं लावतात. आपल्या समाजात तर लग्नानंतर नाव न बदलणं हे अजूनही त्रासदायकच होतं. अनेक ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागतं. त्यातही कागदोपत्री नाव न बदलणं, नवर्याचं आणि मुलांचं आडनाव वेगळं असणं आणि बायकोचं आडनाव वेगळं असणं याचा समाजाला भयंकर त्रास होतो. हे वास्तव आपल्या समाजातलं आहेच पण जगात पुढारलेल्या म्हणवणार्या देशांतही हेच चित्र आहे. अमेरिकेतल्या नेवाडा विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला अभ्यासच तसं सांगतोय. सेक्स रोल्स नावाच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशात केलेल्या अभ्यासातून काही निष्कर्ष त्यांनी जगासमोर ठेवले आहेत.पाश्चिमात्य देशातही लग्नानंतर महिलेने स्वेच्छेने पतीचे आडनाव लावणे ही समाजरीत आहे. बरीच जुनीही आहे. आजही ती रीत अनेकजणी पाळतात. पण गेल्या काही दशकांत महिलांना असा प्रश्न पडू लागला की लग्नानंतर आपलं नाव बदलायची गरज आणि सक्ती काय आहे? नाव न बदलण्याचं प्रमाण बरंच वाढलं. पण नाव बदलणार्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि नाव न बदलणार्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन यात मात्र फरक पडत गेला.या नाव न बदलणार्या महिला अती महत्वाकांक्षी, स्वकेंद्री असतात अशी लेबलं समाजानं लावायला सुरुवात केली. त्या लग्नातही जास्त रुबाब करतात, नवर्यांना वरचढ असतात, डॉमिनेट करतात असं म्हणण्यार्पयत समाजाची मजल जाते. वैवाहिक नात्यात बायको वरचढ तर पती कमजोर ठरतात. बायकोनं कसं प्रेमळ, समजूतदार, नमतं घेणारी, फार रुबाब न करणारी असावं अशीच आजही समाजाची अपेक्षा आहे असं हा अभ्यास म्हणतो.काळ कितीही बदलला आणि समाज विकसीत झाला असं कितीही म्हटलं तरी स्त्रीपुरुष समानतेसंदर्भात अजून बरंच काम बाकी आहे याचं हे विदारक चित्र आहे.
लग्नानंतरही बायको माहेरचंच आडनाव लावतेय? -याचा काय अर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:14 PM
एक नवीन अभ्यास म्हणतोय की, लग्नानंतरही बायकोनं आडनाव बदललं नाही तर लोक त्या लग्नाकडे, नात्याकडे, त्यातल्या सत्ताविभाजनाकडे अजूनही जुनाट नजरांनीच पाहतात. पत्नी पतीला डॉमिनेट करते असं लोकांना वाटतं.
ठळक मुद्देआपण आधुनिक काळात राहत असलो तरी जगभरात आजही बायकोनं लग्नानंतर पडतं घेणंच समाजाला अभिप्रेत आहे का?