- मयूर पठाडे‘समजण्याचं’, जरा ‘अतिच समजण्याचं’ मुलांचं वय अलीकडे हळूहळू खाली यायला लागलंय, याविषयी कोणाचं दुमत असू नये. आपल्या लहानपणी आपण किती ‘बाळू’ होतो, पण आजची पिढी किती स्मार्ट आहे, अनेक गोष्टी त्यांना न सांगता कळतात, अनेक गोष्टी ते वापरतात, ज्या गोष्टी जुन्या पिढीला अजूनही अपरिचित आहेत किंवा त्याचा बागुलबुवा त्यांनी घेतलेला आहे.. तंत्रज्ञानासारखी गोष्ट तर आजची मुलं इतक्या झटपट आत्मसात करतात, कि खरोखरच त्यांचं कौतुक वाटावं. पण पालकांना सध्या सगळ्यात जास्त सतावणारा प्रश्न आहे तो म्हणजे मुलांचं लैंगिक शिक्षण.. याबाबतीत मुलांना स्वत:लाही पूर्णपणे ज्ञान नसतं, शाळेत ते शिकवलं जात नाही, पालकांना त्याविषयी स्वत:लाच भीती, लाज वाटत असते, अशावेळी करायचं काय?मुलांना केव्हा आणि कसं द्यायचं लैंगिक शिक्षण? पालक आणि शाळा, दोन्ही जण याबाबतीत सध्या कमी पडताहेत असं चित्र आहे. शिवाय काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांचा रेटा कायम मागे असतोच..याबाबतीत नेमकं काय घडतंय?१- वयात येणाºया मुलांना लैंगिक शिक्षण देण्याबाबत सरकारपासून तर पालकांपर्यंत सारेच जण बºयाचदा अळीमिळी गुपचिळी करून गप्प बसलेले असतात, आणि त्याचा मुलांच्या भविष्यावर अत्यंत दूरगामी आणि विपरित परिणाम होऊ शकतो, हे वास्तव आहे.२- वयात येणाºया मुलांचं जाऊ द्या, पण अगदी तरुणांनाही याबाबत योग्य ते ज्ञान नसतं ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात नुकत्याच आणि आजवर वारंवार झालेल्या पाहण्यांतही हे वास्तव वेळोवेळी उघड झालं आहे. तरुणांचं याबाबत योग्य ते शिक्षण झालेलं नसेल तर सक्षम भावी पिढी कशी तयार होणार याकडे म्हणूनच अभ्यासकांनाही मोठी चिंता लागून आहे.३- मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? की कुणाचीच नाही आणि मुलं या गोष्टी ‘आपोआप’ शिकतील? - आजही अनेकांचं तसं म्हणणं आहे, पण ही जबाबदारी झटकून चालणार नाही. प्रत्येकानं ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि अर्थातच कोणीच ही जबाबदारी निभवत नाही म्हटल्यावर पालकांची जबाबदारी मग आधी येते.४- कुठल्याच मार्गानं मुलांना याबाबत योग्य ती माहिती मिळत नाही. मग कधी अर्धकच्च्या वयातील आपल्याच मित्रांकडून मिळालेली चुकीची अर्धवट माहिती, इंटरनेट, पोर्न साईट्स, तसली मासिकं.. यामाध्यमांतून नको ती आणि चुकीची माहिती मुलांपर्यंत जाते. ती तपासण्याची आणि त्याविषयी काही बोलण्याची कोणतीही सोय नसल्यानं या चुकीच्या धारणाच त्यांच्या मनात कायम बसतात आणि त्यांचं भावी आयुष्यही मग अशा तकलादू पायावरच उभं राहातं.अभ्यासकांचं म्हणणं आहे, लैंगिक शिक्षण या गोष्टीकडे मुळातच अत्यंत गांभीर्यानं पाहाणं गरजेचं आहे. हे शिक्षण मिळणं प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि ते त्यांना त्या त्या वयात, योग्य तऱ्हेनंच मिळालं पाहिजे.त्यासाठी काय करता येईल? पालक म्हणून आपली जबाबदारी काय? पाहू या पुढच्या भागात..
लैंगिक शिक्षणाबाबतची अळीमिळी गुपचिळी का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:49 PM
अभ्यासकांच्या मते हा प्रश्न लाजेचा नाही, समजून घेण्याचा
ठळक मुद्देमुलांच्या लैंगिक शिक्षणाबाबत अळीमिळी गुपचिळी नको.त्याबाबत समाजातील प्रत्येक घटकानं, पालक, शाळा, समाज, सरकारनं ही जबाबदारी उचलली पाहिजे.चुकीच्या धारणा मुलांच्या मनात ठसल्या की त्या दूर करणं मग महाकठीण होतं आणि एक संपूर्ण पिढीच डळमळत्या पायावर उभी राहते.