तुमचा सेल्फी तुम्हाला वाटतो त्यापेक्षा वाईट दिसतो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2016 3:33 PM
प्रत्येकाला असे वाटते की ते सेल्फीमध्ये जास्त सुंदर किंवा आकर्षक दिसतात.
काही उत्साही संशोधकांनी आपली सर्व बुद्धी पणाला लावून सर्व तरुणाईसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सेल्फीमध्ये लोक खरंच जास्त सुंदर दिसतात का?’या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी टोरोंटो विद्यापीठातील संशोधकांनी 198 विद्यार्थ्यांचा अभ्यास केले. यांपैकी 100 विद्यार्थी असे होते जे नित्यनियमाने रोज सेल्फी काढत असत. प्रत्येकाने आपापल्या सेल्फीची दुसऱ्याने काढलेल्या फोटोंशी तुलना केली. प्रत्येकाने दोन्ही प्रकारच्या फोटोंमध्ये ते किती आकर्षक दिसतात आणि सोशल मीडियावर त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल याची माहिती दिली.त्यानंतर 178 सामान्य लोकांनी या विद्यार्थ्यांच्या फोटोंना आकर्षकता आणि सोशल मीडिया लाईकेबिलिटीच्या आधारावर गुण दिले.अध्ययनाअंती असे दिसून आले की, प्रत्येकाला असे वाटते की ते सेल्फीमध्ये जास्त सुंदर किंवा आकर्षक दिसतात. परंतु इतर लोकांना सेल्फीपेक्षा तुमचे दुसऱ्यानी काढलेले फोटो अधिक आवडतात.जे लोक मोठ्या प्रमाणात सेल्फी काढतात त्यांचे सेल्फीमध्ये स्वत:च्या दिसण्याबद्दलचे मत जरा जास्तच चांगले असते. परंतु इतर लोकांना तुमच्या सेल्फीमध्ये जास्त आकर्षकता दिसून येत नाही हे तथ्य आहे आणि ते मान्यच करावे लागेल. या संशोधनाचे निष्कर्ष सोशल सायकोलॉजी अँड पर्सनालिटी सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.