आपण लग्न ठरताना अथवा ठरवताना गुण मेलनासंदर्भात किंवा 36 गुणांसंदर्भात नक्कीच ऐकले असेल. खरे तर, हिंदू धर्मात लग्नाच्या वेळी वधू आणि वराची कुंडली जुळवून बघितली जाते. यात वधू आणि वराचे गुण जुळतात, की नाही, त्या आधारे विवाह निश्चित केला जातो. तर, या 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया.
हिंदू धर्मात कुंडली जुळवून बघणे आवश्यक - मुलगा आणि मुलगी दोघांचेहे वैवाहिक जीवन सुखी आणि शांततामय रहावे यासाठी कुंडली जुळवून बघितली जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) विवाह जुळण्यासाठी एकूण 36 गुणांवर भाष्य करण्यात आले आहे. लग्नासाठी यांपैकी किमान 18 गुण जुळणे आवश्यक असते. तरच विवाह होऊ शकतो, अन्यथा विवाह अयोग्य असतो.
36 गुण कोणकोणते असतात -विवाहादरम्यान कुंडली मेलन करताना अष्टकूट गुण बघितले जातात. यात नाडीसाठी 8 गुण, भकूटचे 7 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, ताराबलचे 3 गुण, वश्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 गुण जुळवून पाहिला जातो. अशा प्रकारे एकूण 36 गुण असतात. विवाहानंतर वर आणि वधू एकमेकांना अनुकूल असावेत, संतती सुख, धन संपत्तीत वृद्धी, दीर्घायुष्य असावे, यामुळेच दोन्ही पक्षाचे 36 गुण जुळवले जातात. मुहूर्तचिंतामणी ग्रंथामध्ये अष्टकुटात वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडीचा समावेश करण्यात आला आहे.
एवढे गूण जुळणे आवश्यक - लग्नासाठी वधू-वरांचे किमान 18 गुण जुळणे योग्य मानले जाते. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण जुळल्यास ही जुळणी मध्यम मानली जाते. तसेच अधिक गुण जुळल्यास त्याला शुभ विवाह मिलन म्हटले जाते. कुठल्याही वधू-वराच्या बाबतीत 36 गुण मिळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार केवळ भगवान श्री राम आणि सीतेचेच 36 गुण जुळले होते. जर आपल्या कुंडलीचे मिलान 18 गुणांपेक्षा कमी म्हणजेच 17 गुण असेल तर लग्न करू नये. असे मानले जाते की, असा विवाह करणे टाळायला हवे. कारण असा विवाह सुखमय होऊ शकत नाही.
कुंडली जुळवताना 'ही' गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे - जर कुणाच्या कुंटलीत मांगलीक दोष असेल, तर त्याचा विवाह मांगलिक कुंडली असलेल्या व्यक्तीसोबतच करायला हवा. सामान्य व्यक्तीसोबत त्याचा विवाह करू नये. जर असा विवाह झालाच तर तो त्यांच्या वैवाहीक जीवनासाठी योग्य मानला जात नाही.
(टीप : वरील माहिती आणि सूचना या सर्व सामान्य मान्यतांवर आधारलेल्या आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)