Batla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा
By प्राजक्ता चिटणीस | Published: August 14, 2019 06:46 PM2019-08-14T18:46:17+5:302019-08-14T18:51:43+5:30
बाटला हाऊस या चित्रपटात जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून बाटला हाऊस एन्काऊंटर या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
प्राजक्ता चिटणीस
दिल्ली शहरात 2008 मध्ये घडलेले बाटला हाऊस एन्काऊंटर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मीडियात हे एन्काऊंटर चांगलेच गाजले होते. याच घटनेवर आधारित बाटला हाऊस हा चित्रपट असून ही घटना मोठ्या पडद्यावर खूपच चांगल्याप्रकारे मांडण्यात आली आहे.
दिल्लीतील बाटला हाऊस या भागात काही दहशतवादी राहात असल्याचे दिल्ली पोलिसांना कळते. यांना पकडण्याची जबाबदारी संजीव कुमार यादव (जॉन अब्राहम) आणि त्यांच्या टीमला देण्यात येते. संजीव घटनास्थळी पोहोचण्याआधीच इन्सपेक्टर केके (रवी किशन) काही पोलिसांना घेऊन दहशतवादी राहात असलेल्या बिल्डिंगमध्ये घुसतो आणि दहशतावादी आणि पोलिसांमध्ये चकमक होते. यात काही दहशतवादी मारले जातात. पण केके आणि वसीम या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागते. हे सगळे घडेपर्यंत संजीव देखील घटनास्थळी पोहोचतात. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरातील लोक प्रचंड घाबरतात. त्या लोकांना संजीव आणि त्यांची टीम बाहेर काढते. पण या सगळ्यात दोन दहशतवादी पळून जातात. शिल्लक राहिलेल्या दहशतवाद्यांना मारण्यात आणि एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात संजीव यांना यश येते. पण यात केके शहीद होतो. पोलिसांनी दहशतवादींचा खात्मा केला असला तरी मारली गेलेली मुले ही दहशतवादी नसून ती कॉलेजची मुले होती असे काही राजकीय पक्ष आणि मीडियाद्वारे पसरवले जाते. संजीव आणि त्याच्या टीमने बनावट एन्काऊंटर घडवून आणला असा आरोप काही राजकीय पक्ष आणि मीडियाद्वारे त्यांच्यावर केला जातो आणि या एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले जातात. हा एन्काऊंटर बनावट नव्हता हे संजीव आणि त्यांची टीम कशाप्रकारे सिद्ध करते. तसेच पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात त्यांना यश येते का या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील.
बाटला हाऊस हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याने चित्रपटाची कथा काय आहे हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. तसेच चित्रपटाच पुढे काय घडणार याची देखील चित्रपट पाहाताना आपल्याला कल्पना असते. पण तरीही ही चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. आपला जीव धोक्यात घालून देशासाठी काम करणाऱ्या पोलिसांची मानसिकता काय असते हे चित्रपटात खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आले आहे. एन्काऊंटरनंतर कित्येक दिवसांनंतरही त्या एन्काऊंटरमुळे संजीव यांची झालेली अवस्था पाहून आपल्या देखील अंगावर काटा येतो. आपल्या छातीवर कोणीतरी गोळी झाडतेय असे त्यांना सतत वाटत असते, केके सतत त्याच्या डोळ्यासमोर येत असतो, या सगळ्या गोष्टींमुळे ते दिवसेंदिवस मानसिकरित्या खचत असतात ही एका पोलिसाची अवस्था चित्रपटात चांगल्या प्रकारे मांडली आहे. जॉनने त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपट पाहाताना ही भूमिका केवळ त्याच्यासाठीच लिहिण्यात आली होती असेच वाटते. त्याला मृणाल ठाकूरने चांगली साथ दिली आहे.
बाटला हाऊस या चित्रपटाची लांबी थोडी कमी करता आली असती असे काहीवेळा जाणवते. मध्यांतरापर्यंत या चित्रपटाला चांगला वेग आहे. पण त्यानंतर चित्रपट काहीसा संथ झाल्यासारखा जाणवतो. चित्रपटातील एकही गाणी ओठावर रुळत नाहीत. पण चित्रपटाचे संवाद नक्कीच मन जिंकतात. चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलेला कोर्ट रूम ड्रामा तर मस्तच जमून आला आहे. एकंदरीतच एका वेगळ्या विषयावरचा बाटला हाऊस पाहायला काहीच हरकत नाही.