Uri surgical strike movie Review : 'उरी' भारतीय सैन्याची ऐतिहासिक शौर्यगाथा
By गीतांजली | Published: January 9, 2019 03:44 PM2019-01-09T15:44:56+5:302023-08-08T19:47:32+5:30
'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. सिनेमात विकी कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते
गीतांजली आंब्रे
जम्मू काश्मीरच्या 'उरी'मध्ये पाकिस्तानी दशहतवाद्यांनी लष्काराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर देत सर्जिकल स्ट्राईकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित 'उरी' हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहताना तुम्हाला देशभक्तीचा कुठेही अतिरेक झालेला जाणवणार नाही. हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.
''आज तक हमारी सहनशीलता को हमारी कमजोरी समझा जाता था, मगर अब नहीं...ये नया हिन्दुस्तान है. ये हिन्दुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी अशा प्रकारच्या दमदार डायलॉगने पाकिस्तानच्या विरुद्धच्या युद्धला सुरुवात होते. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल ) आणि कॅप्टन करण कश्यप यांच्या मणिपूरमधील कँपवर दहशतवादी हल्ला करतात. त्याला ते चोख उत्तर देखील देतात. विहानची आई (स्वरुप संपत) अल्जायमर्सने ग्रस्त असते त्यामुळे तो बॉर्डरवरुन दिल्लीत पोस्टिंग घेतो. त्याच दरम्यान उरीमध्ये दहशतवादी भ्याड हल्ला करतात. या हल्ल्यात विहानचा जीवलग मित्र आणि बहिणीचा पती करण कश्यप शहीद होतो. याला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी भारत सर्जिकल स्ट्राईक करायचे ठरवते. या मोहिमेची आखणी आणि नेतृत्व विहान करतो. ही मोहिमे तो कशाप्रकारे यशस्वी करतो हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागले.
दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राईकची 10 दिवसांतील चित्तथरारक गोष्टी मोठ्या पडद्यावर उत्तमरित्या रेखाटल्या असून हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सिनेमात विकी कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते. तर यामी गौतमच्या वाटेला छोटी भूमिका आली आहे मात्र तिने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. परेश रावल, मोहित रैना, किर्ती कुल्हारी यांची भूमिका थोडीशी असली तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेकवेळा सर्जिकल स्ट्राईकबाबत वाचलंय किंवा ऐकलंय मात्र ही संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरते. हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच पाहावा लागेल.