चांगल्या विषयाची साधारण मांडणी…!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 05:36 PM2016-10-21T17:36:36+5:302023-08-08T19:28:38+5:30
पौगंडावस्थेतल्या मुलांच्या आयुष्यावर आधारित 'कौल मनाचा' सिनेमा
पौगंडावस्थेतल्या मुलांच्या आयुष्यावर काही कलाकृती यापूर्वी येऊन गेल्या असताना, हाच विषय 'कौल मनाचा' या चित्रपटानेही हाताळला आहे. साहजिकच, यात नाविन्य काय असणार याची उत्सुकता लागून राहते. त्यासाठी या चित्रपटाच्या टीमने प्रामाणिक प्रयत्न केले असले, तरी एकूणच चित्रपटाची गोळाबेरीज काही तितकीशी जमलेली नाही. चित्रपटाचा फोकस चांगला असला, तरी त्याची मांडणी मात्र साधारण पातळीवर रेंगाळली आहे. या विषयावरचा अजून एक प्रयत्न म्हणून केवळ हा चित्रपट त्याची दखल घ्यायला लावतो.
या चित्रपटाची गोष्ट घडते ती विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये ! सिनेमाने प्रचंड प्रभावित असलेला व सतत डायलॉगबाजी करणाऱ्या राज आणि त्याच्या मित्रांची ही गोष्ट आहे. दहावीच्या वर्गात शिकणारा राज हा खूप हूड आणि दंगेखोर मुलगा आहे आणि त्याची वर्तणूक व्रात्यपणाची आहे. हेमा या शिक्षिकेकडे तो प्रथम आकर्षिला जातो. पण एकदा त्याच्या आभासी विश्वात त्याची वर्गमैत्रीण रितिका अवतरते आणि तो वास्तवात तिच्या प्रेमात पडतो. पण रितिकाचे प्रेम प्रथमेशवर असते. पुढे सिनेमाच्या विश्वात रमलेला राज, रितिकासाठी त्याग वगैरे करू पाहतो. याच दरम्यान, शिक्षिका हेमा आणि चित्रकलेचे शिक्षक साने यांचे लग्न जुळते. त्यासाठी त्यांनी कर्नाटकमधल्या एका देवीचा कौल वगैरे घेतलेला असतो. राजला हे समजल्यावर तो रितिका आणि प्रथमेशसह कर्नाटकला जाऊन पोहोचतो. त्यांचा हा प्रवास आणि त्यांच्या संस्कारक्षम वयातल्या नाजूक भावबंधांचा संगम साधत ही गोष्ट पुढे एका वळणावर येऊन ठेपते.
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन भीमराव मुडे यांचे आहे; तर त्यांच्यासह श्वेता पेंडसे हिने चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. संवादलेखनाची जबाबदारीही श्वेता पेंडसे हिने उचलली आहे. मराठी, संस्कृत आणि कानडी लहेज्यातले तिचे संवाद जमून आले आहेत. पौगंडावस्थेतल्या मुलांचे विश्व या कथेत चितारले आहे आणि प्रौढ व्यक्तींच्या आयुष्याच्या संदर्भाने ते गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करताना, चित्रपटाची लांबी बऱ्यापैकी वाढत गेली आहे. त्यामुळे चित्रपट कधी संपतो असे वाटत राहते. मुळात कथेतली मुले ज्यामुळे प्रवास करण्यास निघतात; त्यामागचे कारण तितकेसे भक्कम वाटत नाही. केवळ उत्सुकतेपोटी ते हे सर्व करत असल्याचे जाणवत राहते. चित्रपटातले काही प्रसंग अवास्तव वाटतात आणि त्यांची उत्तरे मिळत नाहीत.
अभिनयाच्या पातळीवर मात्र मुलांनी बाजी मारली आहे. आशुतोष गायकवाड याने राजची मुख्य व्यक्तिरेखा चांगल्या तऱ्हेने पेलण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याच्या डायलॉगबाजीला थोडी कात्री लागायला हवी होती. गिरीजा प्रभू (रितिका), निनाद तांबडे (प्रथमेश) व गणेश सोनावणे (विश्वंभर) यांची चांगली साथ त्याला लाभली आहे. गिरीजाकडून यापुढे अधिक अपेक्षा ठेवायला हरकत नाही. राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, श्वेता पेंडसे, विजय चव्हाण, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर, विजय गोखले, कमलेश सावंत आदी सिनिअर कलावंतांनी अनुभवाच्या जोरावर आपापल्या भूमिका रंगवल्या आहेत. एक आश्वासक प्रयत्न, एवढाच या चित्रपटातून निष्कर्ष काढता येऊ शकतो. बाकी या कथेला अजून दमदार ट्रीटमेंट मिळाली असती, तर तिचा परिणाम अधिक उंचावला असता.