Ti Ani Itar Review:चर्चेच्या पातळीवर रंगलेले रहस्य...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2017 10:40 AM2017-07-01T10:40:49+5:302017-07-21T17:31:30+5:30
गोविंद निहलानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. दर्जेदार सिनेमांची निर्मिती ही निहलानी यांची खासियत राहिली आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ती आणि इतर सिनेमाच्या निमित्ताने गोविंद निहलानी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
छोट्या गोष्टीचा मोठा परिणाम, हे 'ती आणि इतर' या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे आणि ते तसे ठसवण्याएवढी कामगिरी या चित्रपटाने निश्चित केली आहे. या गोष्टीचा जीव लहान आहे आणि त्यात एक रहस्य दडलेले आहे. पण ते रंगवताना चर्चेच्या झालेल्या अतिरेकाचा पगडाच मनावर शेवटपर्यंत राहतो. वास्तविक, एक महत्त्वाचा सामाजिक धागा यात गुंफला आहे; परंतु तो चर्चेच्या पातळीपुरताच मर्यादित राहिला आहे.
चित्रपटाची नायिका नयना ही एक गायिका आहे आणि तिच्या नवीन अल्बमचे 'सेलिब्रेशन' करण्यासाठी ती व तिचा नवरा अनिरुद्ध यांची मित्रमंडळी त्यांच्या घरी पार्टीसाठी जमले आहेत. या पार्टीच्या दरम्यान त्यांच्या समोरच्या बिल्डिंगमधून एका स्त्रीची किंकाळी ऐकू येते आणि तिथे एखादा गुन्हा घडत असल्याची चाहूल लागते. मात्र हे नेहमीचेच असल्याचे नयना व अनिरुद्ध यांचे म्हणणे असते. काय असतो हा सगळा प्रकार, याची उत्कंठा वाढवत हा चित्रपट शेवटापर्यंत येऊन ठेपतो.
पटकथा व संवादलेखिका शांता गोखले आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा हा चित्रपट त्यांचा खास असा 'टच' नक्कीच दाखवतो. वास्तविक, चित्रपटाची गोष्ट छोटी आहे आणि ती फुलवण्यासाठी कसब पणाला लावले आहे. मात्र हे करताना सतत चर्चा आणि चर्चा हा प्रकार इतका ताणला आहे, की एका क्षणी त्याचा कंटाळा येतो. या चित्रपटावर हिंदी चित्रपटाची असलेली छायाही लपून राहिलेली नाही. मध्यमवर्गीय मानसिकतेवर ठेवलेले अचूक बोट, हे मात्र यात ठळकपणे दिसते. मूळ गोष्टीपेक्षा हेच दिग्दर्शकाला अधिक ठसवायचे आहे का, असा प्रश्न यातून पडतो. पण एका रहस्याची उकल होण्यासाठीची पार्श्वभूमी त्यातून निर्माण होते.
सोनाली कुलकर्णी (नयना), सुबोध भावे (अनिरुद्ध) या मुख्य व्यक्तिरेखांसह अमृता सुभाष, भूषण प्रधान, आविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, सुमन पटेल, गणेश यादव यांनी यात साकारलेल्या भूमिका ठोस आहेत. सोनाली कुलकर्णी व सुबोध भावे यांना यात फार काही विशेष करण्यास वाव मिळालेला नाही. रिंकूच्या भूमिकेतली सुमन पटेल लक्षात राहते. एकूणच, या चित्रपटातले रहस्य उलगडेपर्यंत उत्कंठा ताणून ठेवण्याचा केलेला प्रयत्न मात्र जमून आला आहे.