आष्टा ते कोल्हापूर जाणाऱ्या मार्गावर शिगावनजीक चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा पोलिसांनी लॉकडाऊन काळात विना मास्क फिरणाऱ्या ३६० लोकांवर कारवाई करीत १ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी दिली.
सिद म्हणाले, आष्टा परिसरातही रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या काळातही पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये अशा पोलिसांनी सूचना देऊनही काही लोक घराबाहेर पडत आहेत. अशा एकूण ३६० नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून सुरू ठेवलेल्या दोन हॉटेल, दोन दुकानदारांवर, तसेच ३२ लोकांवर भारतीय दंडसंहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, तसेच साथ रोग अधिनियम अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणारे एकूण ६५ दुचाकी व एक मोटार ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
अप्पर तहसीलदार आष्टा, नगरपरिषद आष्टा, ग्रामीण रुग्णालय आष्टा यांच्यासह संयुक्त मोहीम राबवून विनाकारण फिरणाऱ्या ऐंशी लोकांची अॅँटीजन रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला इस्लामपूर कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आष्टा शहरातून रूट मार्च काढून व ध्वनिक्षेपकद्वारे लोकांमध्ये जनजागृती करून संचारबंदी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी संचारबंदी कालावधीत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन अजित सिद यांनी केले आहे.
चौकट
आष्टा ते कोल्हापूर जाणाऱ्या मार्गावर शिगावनजीक चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे. वडगाव, कोल्हापूर या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना पास असेल तरच अनुमती देण्यात येत आहे. या ठिकाणी अहोरात्र पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.