विटा : वाळूज (ता. खानापूर) येथील जनार्दनशेठ बाबर यांचा बंगला फोडून रोख तीन लाखाच्या रोकडसह ५२ लाख ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या बिराप्पा सिध्दाप्पा बन्ने (३१, मूळ गाव सोन्याळ, ता. जत, सध्या रा. वाळूज) या चोरट्यास विटा पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३२ लाख ८९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. संशयित बिराप्पा हा बाबर यांच्या बंगल्यातील कामगाराचा मुलगा आहे.
वाळूज येथील जनार्दनशेठ बाबर यांचा चेन्नई येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा उद्योग आहे. गावी सिध्दाप्पा बन्ने हा कामगार घराची देखभाल करतो. त्यासोबत त्याचा मुलगा बिराप्पा असतो. बाबर यांच्या बंगल्याच्या टेरेसच्या दरवाजाचे कुलूप तोडून बिराप्पाने कपाटातील रोख तीन लाखाच्या रोकडसह ५२ लाख ७१ हजार रुपयांचे एक किलो ४५५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बिराप्पा गायब असल्याचे निदर्शनास आले. उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी बिराप्पास ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ३२ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. या चोरीतील ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने बिराप्पाने सांगली, विटा, चडचण, लेंगरे येथील बॅँका व सराफ दुकानदारांकडे तारण ठेवले असल्याने ते त्यांच्याकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पुढील तपास करीत आहेत. पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी चोरी उघडकीस आणणा-या पोलिसांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.जमिनीत लपवले दागिनेबिराप्पाने चोरीनंतर सर्व सोने जमिनीत लपवून ठेवले होते. दिवाळीपूर्वी फिर्यादीस त्यांचा मुद्देमाल परत करण्यात येईल, असे अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगितले.
कामगारांची माहिती द्या : सुहैल शर्मासराफी दुकानात काम करणाºया कामगारांची माहिती पोलीस ठाण्यांना द्यावी. त्याचे नाममात्र शुल्क आहे. सांगलीतील सराफ व्यावसायिक कामगारांची माहिती पोलिसांना देत नाहीत. अनेक घटनेत कामगारानेच चोरी केल्याचे समोर आले आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी कामगारांची माहिती द्यावी, असे आवाहनही शर्मा यांनी केले.
वाळूज (ता. खानापूर) येथील चोरी प्रकरणातील सोन्याचे दागिने जप्त करून संशयितास ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके उपस्थित होते.