लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार, किमान ८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होईल. ही पिके कुजण्याचा धोका असल्याने, शेतकऱ्यांचे किमान १० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फळे, भाजीपाल्याचे तर पूर्ण नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्याने शेतामध्ये ठाण मांडले आहे. त्यामुळे आडसाली ऊस या नगदी पिकासह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी, कडधान्ये अशा सर्व पिकांची नासाडी होण्याची भीती आहे, तसेच शेतात उभा असलेला उसाचेही नुकसान होणार आहे. यावेळी तरी खरीप पिके हाताला लागतील, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची या महापुराने पूर्ण निराशा करून टाकली आहे.
तालुक्यात १२ हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर नवीन आडसाली उसाची लागण करण्यात आली आहे. उसाचे एकूण क्षेत्र हे ४७ हजार ९३२ हेक्टर आहे. त्या खालोखाल १६ हजार २१९ हेक्टरमध्ये सोयाबीन पीक आहे, तर ९ हजार ३१९ हेक्टर क्षेत्रात भुईमुगाचे पीक आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठाला असणाऱ्या या पिकांना मोठा फटका बसणार आहे. वारणा नदीचे पाणी पात्रातून लगेच बाहेर पडून ते वेगाने शेतपट्ट्यात घुसत असल्याने, या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने म्हणाले, या पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पिके कुजून जाण्याचा धोका आहे. आडसाली उसाची लागण आणि खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर गावनिहाय कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक अशी पथके केली आहेत. त्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, त्यांनी या पथकाशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. पथकांकडून नुकसानीची पाहणी करून, हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल.
फोटो : २५ इस्लामपुर ३..४
वाळवा तालुक्यातील बहे येथे पुराच्या पाण्यात बाधित झालेले सोयाबीन आणि भुईमुगाचे पीक, तर दुसऱ्या छायाचित्रात वारणा नदीकाठचे उसाचे पीक असे उन्मळून पडले आहे.