सांगली : शहरासह जिल्ह्यात सुरक्षितता आणि शांतता राहण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता सांगलीत सद्भावना एकता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते असा दहा हजाराचा जनसमुदाय सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली.
कोरेगाव-भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, दि. १४ जानेवारी रोजी सद्भावना एकता रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले की, आपल्या शहरात सामाजिक सलोखा आणि एकी राहावी, यासाठी ही एकता रॅली काढण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचाºयांनी शासकीय उपक्रमाचा सोपस्कार म्हणून नव्हे, तर समाजाचा एक घटक म्हणून या रॅलीत मन:पूर्वक सहभागी व्हावे. या रॅलीमध्ये सहभागी होणाºया घटकांसाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित खातेप्रमुखांना दिले. रॅलीसाठी नियंत्रण समिती, व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी समिती आदी समित्यांची स्थापना करण्याचे आणि उपस्थितांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून रूग्णवाहिका, अग्निशामक, वैद्यकीय पथक आदींची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, विविध मोर्चांमुळे भौतिक नुकसानीपेक्षा मना-मनांमध्ये दुही निर्माण होते. ही एकप्रकारे भरून न येणारी सामाजिक मानसिक हानी आहे. शासकीय सेवेत येताना आपण मानवतेची शपथ घेत असतो. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने काढण्यात येणारी ही राज्यातील पहिली सद्भावना एकता रॅली मना-मनांना सांधणारा धागा ठरेल. यातून एकतेचा, सामाजिक समतेचा विचार पेरला जाणार आहे. यात आपले हात एकत्र येणार नसून, मने गुंफली जाणार असल्याचेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.सर्वपक्षीय कृती समितीचा पाठिंबासर्वपक्षीय कृती समितीने या एकता रॅलीला पाठिंबा दिला आहे. अन्य सामाजिक संघटनाही आंदोलनात सहभागी होणार आहेत. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारकांच्या वेशभूषेत यावे, असेही या बैठकीत सूचित करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीस एकच राष्ट्रध्वज असणार आहे. अन्य कोणताही झेंडा या रॅलीत असणार नाही. यावेळी उपस्थितांना एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे.
रॅलीचा मार्गदि. १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता सर्वजण पुष्पराज चौकामध्ये एकत्रित जमा होणार आहेत. या चौकापासून ही रॅली सुरु होऊन राम मंदिर, पंचमुखी मारूती रस्ता, गरवारे महाविद्यालय, महानगरपालिका, राजवाडा चौक मार्गे निघून शिवाजी स्टेडियममध्ये येऊन रॅलीची सांगता होईल. या रॅलीमध्ये विविध विभागांचे मंत्री, अभिनेते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.