सांगली : मिरज ते सांगली रस्त्यावर कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वेपूल तोडण्यात येणार आहे. त्यामुळे मिरज जंक्शनवर दररोज जाणाऱ्या ३० हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ती दूर करण्यासाठी मिरजेतून धावणाऱ्या दहा पॅसेंजर रेल्वेगाड्या सांगलीतून सोडाव्यात, असा पर्याय नागरिक जागृती मंचने सुचविला आहे.
मिरज रेल्वे स्टेशनवरून सध्या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू कराव्यात व या दहा गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरही थांबा द्यावा. या गाड्या सांगलीवरून सुटून विश्रामबाग येथे थांबून पुढे मिरज रेल्वे स्टेशनला थांबतील व मिरज रेल्वे स्टेशनवरून त्यांचा पुढचा प्रवास करतील.
दहा रेल्वेगाड्या सांगली व विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून उपलब्ध झाल्यामुळे सांगली शहर व सांगली जिल्ह्यातून मिरज रेल्वे जंक्शनला जाणाऱ्या लोकांची गर्दी कमी होईल. सुमारे २५ ते ३० हजार लोक सांगली व विश्रामबाग या दोन रेल्वे स्टेशनवरूनच प्रवास करू शकतील. सांगली रेल्वे स्टेशनचा खूप मोठा विस्तार करण्यात आला असून, आता येथे सात प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यापैकी प्रवासी चढण्यासाठी पाच उंच प्लॅटफॉर्म व मालगाड्यांसाठी दोन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.
या गाड्या सांगलीतून सोडण्याची मागणी -मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजरमिरज-हुबळी एक्स्प्रेसमिरज-लोंढा एक्स्प्रेसमिरज-बंगळुरू एक्स्प्रेसमिरज-परळी वैजनाथ एक्स्प्रेसमिरज-कॅसलरॉक एक्स्प्रेसमिरज-बेळगाव पॅसेंजर
किर्लोस्करवाडीतूनही गाड्या सोडण्याची मागणीमिरज-कोल्हापूर दुपारची लोकल, मिरज-कोल्हापूर सायंकाळची लोकल, अशा दोन गाड्या किर्लोस्करवाडी स्थानकावरून सोडाव्यात व या गाड्यांना अमणापूर, भिलवडी, नांद्रे, माधवनगर, सांगली व विश्रामबाग येथे थांबा द्यावा, अशी मागणी केली आहे.