इस्लामपूर : इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दुचाकी चोरट्यांना पकडण्याची मोहीम आणखी तीव्र करताना, त्यांच्याभाेवती कारवाईचा फास आवळला आहे. चार दिवसांपूर्वी पाच दुचाकी हस्तगत केल्यानंतर सोमवारी पुन्हा नव्याने दोघा चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या.
अमोल हणमंत पाटील (वय २१, रा. शेणे, ता. वाळवा) आणि पप्पू ऊर्फ विवेक मानसिंग काळे (३०, रा. वाळवा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर प्रमुख मनीषा दुबुले यांनी दुचाकींच्या वाढत्या चोऱ्यांमुळे अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते. शहरामध्ये गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना चोरट्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या दोघांना अटक केली.
या कारवाईत हवालदार सोमनाथ पाटील, गणेश मोहिते, अमोल चव्हाण, उत्तम माळी, संदीप पाटील, सूरज जगदाळे, गणेश शेळके, आलमगीर लतीफ, योगेश जाधव, उमेश शेटे, जयराम चव्हाण यांनी भाग घेतला.
चौकट
पोलिसांशी संपर्क साधा...
इस्लामपूर पोलिसांनी गेल्या चार दिवसांत चार चोरट्यांकडून चार लाख रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शहर व परिसरातून ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या असतील, त्यांनी दुचाकीच्या कागदपत्रांसह पोलिसांशी संपर्क साधून आपल्या वाहनाची ओळख पटवून घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.
फोटो ०७१२२०२०-आयएसएलएम -इस्लामपूर क्राईम न्यूज
इस्लामपूर येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडलेल्या दुचाकी व चोरट्यांसमवेत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व कर्मचारी.