सांगली : राजकीय तज्ज्ञांचे अंदाज खोटे ठरवित सांगली महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामासाठी १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती भाजपचे नेते व नगरसेवकांना दिली.सांगली महापालिकेवर गेली २० वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच स्वबळावर उतरलेल्या भाजपने दोन्ही काँग्रेसला चारीमुंड्या चित केले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून या विजयाबद्दल जिल्ह्यातील नेत्यांचे कौतुक होत आहे.
बुधवारी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, दीपक शिंदे म्हैसाळकर यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत देशमुख यांनी नूतन नगरसेवकांचा सत्कार करीत पारदर्शी कारभार करण्याच्या सूचना केल्या.त्यानंतर देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी केला. मुख्यमंत्र्यांनीही नूतन नगरसेवकांशी काहीकाळ संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रलंबित विकासकामासाठी १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याची घोषणाही केली. महापालिकेतील भाजपच्या विजयाच्या रुपाने मुख्यमंत्र्यांनी सांगलीला गिफ्टच दिल्याची प्रतिक्रिया आ. गाडगीळ यांनी व्यक्त केली.नवीन कामांचे प्रस्ताव देणार : गाडगीळराज्य शासनाकडे कुपवाड ड्रेनेज योजनेसह काही विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तेही लवकरच मार्गी लागतील. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटीचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. महापौर निवडीनंतर या अनुदानातून विकासकामांचे नवीन प्र्रस्ताव तयार करून शासनाला सादर केले जातील. या कामांचा मुहुर्तही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते केले जाईल, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.