कवठेमहांकाळ : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला. एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पाेलिसांच्या पथकाने छापा टाकला. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंदाजे १०० किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती नीरज उबाळे यांना मिळाली. त्यांच्यासह मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठाण मांडले आहे. इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता. मुंबई पाेलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे शंभर किलाे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. दरम्यान, या कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ तालुक्यातील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले.मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक या कारवाईत सहभागी हाेते. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शंभर किलो एमडी ड्रग्ज जप्त, मुंबईच्या पोलिस पथकाची सांगलीत मोठी कारवाई
By संतोष भिसे | Published: March 25, 2024 5:17 PM