अशुतोष कस्तुरे ।कुंडल : पलूस तालुक्यात ‘आयुष्यमान योजने’ची शंभर टक्के नोंदणी झाली आहे. याबाबतचा सर्व्हे २०११ मध्ये ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आला होता. त्यानुसार पलूस तालुक्यामध्ये ७ हजार ९६९ इतक्या कुटुंबांंची नावे कळविण्यात आली. त्यापैकी कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ४ हजार ३६७, तर भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ३ हजार ६०२ कुटुंबांंची नावे कळविण्यात आली होती. या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या शंभर टक्के नोंदी पूर्ण झाल्या आहेत. या कुटुंबांच्या आॅनलाईन नोंदींना सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करून नोंदी करण्यात आल्या आहेत.
गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून शासनामार्फत आयुष्यमान योजना सुरू केली. सध्या वैद्यकीय सुविधांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाला आहे. त्यामुळे शासनामार्फत आयुष्यमान योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जाणार आहेत.
पलूस तालुक्यामध्ये कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कुंडल, पुणदीवाडी, नागराळे, रा.नगर, आंधळी, मोराळे, बांबवडे, तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, शेरे दुधोंडी, सांडगेवाडी, पलूस, सावंतपूर, पुणदी अशी १६ गावे येतात.या गावांमधून ३ हजार ५९४ कुटुंबांचे अर्ज नोंदविले आहेत, तर १९० अस्तित्वात नसलेली कुटुंबे, संपर्क न होऊ शकलेली १४९, स्थलांतरित ४३४ असा सर्व्हे झाला आहे.
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भिलवडी, भिलवडी स्टेशन, अंकलखोप, खटाव, वसगडे, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, हजारवाडी, धनगाव, नागठोणे, संतगाव, सूर्यगाव, आमणापूर, बुर्ली, विठ्ठलवाडी अशी १७ गावे येतात. या गावांमधून ३ हजार १४३ कुटुंबांचे अर्ज नोंदविले आहेत, तर ११२ अस्तित्वात नसलेली कुटुंबे, संपर्क न होऊ शकलेली १६८, स्थलांतरित १७९, असा सर्व्हे पूर्ण झाला आहे.
संपर्क न होऊ शकलेल्या कुटुंबांशी ग्रामसेवकांनी संपर्क साधून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून जास्तीत-जास्त लाभ कसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत.- डॉ. ए. बी. चौगुले, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंडल.