लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा पोलिस दलातील अडचणी सोडवून त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांकडूनही आता प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे बंद झाले की गुन्हेगारीचेही प्रमाण कमी होणार असल्याने येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील अवैध धंदे शंभर टक्के बंद करा, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीचे लोर्कापण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर अधीक्षक तुषार पाटील, उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री खाडे म्हणाले की, पोलिस दलाला कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठीच आता सुविधा देण्यात येत आहेत. ज्याठिकाणी पोलिसांची वाहने पोहोचू शकत नाहीत त्याठिकाणी जाण्यासाठी आता लहाने वाहने देण्यात येत आहेत. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्यावर आता कोणाचाही मुलाहिजा न राखता कारवाई होणे आवश्यक आहे. येत्या दोन महिन्यात शंभर टक्के अवैध धंदे बंड केले पाहिजेत. गुन्हे रोखण्यासाठी बिट मार्शल यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचा फायदा होईल.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले की, बीट मार्शल यंत्रणेसाठी ६६ दुचाकी वाहने मिळाली आहेत. यात ४० बीट मार्शल कार्यरत ठेवण्याचे नियोजन आहे. बीट मार्शलना एक मोबाईल दिला असून, बीटमधील नागरिकांकडेही याचा क्रमांक असणार आहे. शहरात ३५ बीट मार्शल व ४ ट्राफिक बीट मार्शल व एक महिला बीट मार्शल असे एकूण ४० बीट मार्शल असतील सांगली मिरजेसह जत, इस्लामपूर, तासगाव, विटा व आष्टा येथेही बीट मार्शल नियुक्त केले जाणार आहेत.
पोलिसांचे लक्ष मोबाईलमध्ये नको
पालकमंत्री खाडे म्हणाले की,बीट मार्शलकडे मोबाईल व त्याला ठराविक एक क्रमांक देण्याची सुविधा राज्यात आदर्शवत ठरू शकते. मात्र, पोलिसांना दिलेल्या मोबाईलमध्ये कोणतेही सोशल मीडिया असू नये. नाहीतर पोलिस झाडाखाली सोशल मीडिया पाहत आणि चोरटे त्यांच्या समोरूनच निघून जातील. गुन्हेगारांना एक झटका द्यावा जेणेकरून गुन्हे कमी होतील.